'पंडित नेहरू' फलकांच्या अतिक्रमणात; काँग्रेसने दिला अल्टीमेटम


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ब्रिटीश काळात १९४२च्या चले जाव आंदोलनानंतर नगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध असलेल्या व तेथेच डिस्कव्हरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) ग्रंथ लिहिणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या स्मृति जपण्यासाठी नगरला त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पण तो जाहिरातींच्या फलकांनी झाकून गेला असल्याने हे फलक तुम्ही हटवता, की आम्ही हटवू, असा अल्टीमेटम शहर जिल्हा काँग्रेसने महापालिकेला दिला आहे. सात दिवसांची मुदत यासाठी देण्यात आली आहे. त्या काळात या पुतळ्यासमोरचे फलक पालिका हटवते की काँग्रेस कार्यकर्ते हटवतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लालटाकी येथील पुतळ्याला पूर्णतः झाकून टाकणारे होर्डिंग्ज तेथे उभारण्यात आले आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी या पुतळ्याच्या परिसरातील अस्वच्छतेबाबत काहींनी आवाज उठवला होता. त्यानंतर तेथे स्वच्छता करून लाईटही लावण्यात आले आहेत. पण अप्पू हत्ती पुतळ्याजवळून जाताना बाहेर रस्त्यावर असलेल्या जाहिरात फलकांमुळे हा पुतळा दिसतच नाही. या पार्श्वभूमीवर, 'हे फलक तुम्ही हटवता, की आम्ही हटवू' असा आक्रमक पवित्रा विद्यार्थी काँग्रेसने घेतला असून, मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे यांनी याचा जाब त्यांना विचारला. 

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप, प्रवीणभैय्या गीते पाटील, अमीत भांड, प्रमोद अबुज, राजभैय्या गायकवाड, प्रशांत जाधव, सचिन वारुळे, राज मयूर घोरपडे, सोमनाथ गुलदगड, योगेश जयस्वाल, सिद्धार्थ कारंडे, ऋतिक शिराळे, आदित्य तोडमल, जय शिंदे, साहिल शेख, पप्पू डोंगरे, मनोज उंद्रे, निखिल गलांडे, जॉय त्रिभुवन, अशोक गायकवाड, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

मनपा उपायुक्त संतोष लांडगे यांचे दालन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या 'अमर रहे, अमर रहे, पंडित नेहरू अमर रहे' या घोषणांनी दणाणून गेले होते. नेहरू पुतळ्याच्या कंपौंडवर चार मोठे व्यावसायिक होर्डिंग्ज लावून नेहरूजींच्या पुतळ्याला बंदिस्त करण्याचे पाप मनपाने केले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेसजनांच्या भावना लक्षात घेता या भावनांचा उद्रेक होण्याआधीच मनपाने हे होर्डिंग्ज तातडीने हटवावेत. सात दिवसांच्या आत हटवले नाही तर आम्ही हटवू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post