'नेहरू' होणार अतिक्रमणमुक्त.. तेही चक्क बुलडोझरने!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व बालगोपालांचे लाडके चाचा नेहरू यांचा नगरच्या लालटाकीवर पुतळा असून, तो रस्त्यावरील जाहिरातींच्या होर्डिंग्जने झाकून गेला आहे. होर्डिंग्जची ही अतिक्रमणे महापालिकेला सांगूनही त्यांनी हटवली नसल्याने आता चक्क बुलडोझर लावून तोडली जाणार आहे व त्यासाठी येत्या १२ जानेवारीचा दिवस निश्चित केला गेला आहे. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे व या आंदोलनामागच्या हेतूची माहिती ते स्वतः जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना भेटून देणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मनपाद्वारे संबंधित जाहिरात होर्डिंग्ज हटवली जातात की शहर काँग्रेसवाले ते तोडून टाकतात, याची उत्सुकता आहे.

ब्रिटीश काळातील १९४२च्या 'चले जाव' आंदोलनाच्या काळात ब्रिटीशांनी पंडित नेहरूंसह १२ राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या भूईकोट किल्ल्यात स्थानबद्ध केले होते. त्यावेळी नगरला असताना पंडित नेहरूंनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' (भारताचा शोध) ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे त्यांच्या येथील रहिवासाच्या स्मृति जतन करण्यासाठी नगरच्या अप्पू हत्ती चौक-लालटाकी परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. छोटेखानी टेकडीसदृश जागेवर हा पुतळा असला तरी अप्पू हत्ती चौकातील जाहिरातींच्या होर्डिंग्जमुळे हा पुतळा कोणालाही दिसत नाही. याबाबत नाराजी व्यक्त करताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाला ७ दिवसात संबंधित होर्डिंग्ज काढावीत व पुतळा दिसेल अशी व्यवस्था करताना पुतळ्याच्या परिसरात स्वच्छताही करण्याचे आवाहन केले होते. पण मनपाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले व येत्या १२ जानेवारीपर्यंत संबंधित जाहिरात होर्डिंग्ज महापालिकेने काढले नाही तर शहरजिल्हा काँग्रेसद्वारे बुलडोझर लावून ते पाडण्याचे व नेहरूंचा पुतळा अतिक्रमण मुक्त करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत माहिती देताना काळे म्हणाले, विद्यार्थी काँग्रेसने लालटकी येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला झाकून टाकणारे होर्डिंग काढून टाकण्यासाठी महापालिकेला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. सात दिवस लोटले तरी देखील जातीयवादी भाजपची सत्ता असणाऱ्या मनपाने जाणीवपूर्वक होर्डिंग्ज हटविले नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी याच्या निषेधार्थ मनपामध्ये ठिय्या आंदोलन केले. 'पंडित नेहरू अमर रहे'...अशा घोषणांचे फलक हातात धरत यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सत्ताधाऱ्यांवर टीका
या आंदोलनाच्यावेळी बोलताना काळे म्हणाले, मनपा प्रशासन दबावाखाली काम करीत आहे. जातीयवादी असणाऱ्या भाजपची महापालिकेत सत्ता आहे. यामुळेच हा सर्व प्रकार सुरु आहे. या सत्तेत स्थानिक राष्ट्रवादी भागीदार आहे. त्यांनी देखील याबाबतीत काही भूमिका घेऊ नये, ही काँग्रेससाठी खेदाची बाब आहे, अशी टीका करून ते पुढे म्हणाले, पंडित नेहरू थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देशाचे पहिले पंतप्रधान होते. पुतळ्याच्या परिसराची दैनावस्था मनपाच्या गलथान कारभारामुळेच झाली आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत. पं. नेहरू हा विषय काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आस्था आणि श्रद्धेचा आहे, हे मनपाने विसरू नये. एका बाजूला नगर शहराच्या विकासाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. नागरिक हवालदिल झालेले आहेत. चांगले काही करण्यामध्ये मनपातील सत्ताधारी पूर्णतः अपयशी आहेतच, पण त्याचबरोबर पंडित नेहरू पुतळा आणि परिसराची दैनावस्था करून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखण्याचे पाप जाणीवपूर्वक केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी फारुख शेख, खलिल सय्यद, एनएसयूआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्याक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप यांची भाषणे झाली. मागासवर्गीय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट, अनंत गारदे, कौसर खान, नीताताई बर्वे, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते पाटील, चेतन रोहोकले, डॉ. रिजवान शेख, प्रमोद अबुज, अमित भांड, अजित वाडेकर, शरीफ सय्यद, विकी करोलिया आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

जिजाऊ जयंतीदिनी काँग्रेस स्वतः होर्डिंग्ज हटविणार
मनपाने काँग्रेसच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वतः १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंतीदिनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद पुतळ्याला अभिवादन करून बुलडोझरने स्वतः होर्डिंग्ज हटवतील, अशी घोषणा आंदोलनाच्या समारोप प्रसंगी काळे यांनी केली आहे. यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी मनपा जबाबदार असेल, असाही इशारा त्यांनी दिला. पक्षाच्या या भूमिकेची माहिती जिल्हाधिकारी व मनपाचे प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली जाणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post