ऑपरेशन मुस्कानमध्ये ४७ बालके पालकांच्या हवाली


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोणी घरातून स्वतःहून निघून गेले होते, तर कोणी घरात होणाऱ्या त्रासाला कंटाळून बाहेर पडले होते तर काहींना विविध आमीषे दाखवत फुस लावून पळवून नेले होते. पोलिसांच्या रेकॉर्डला यापैकी कोणाचीही हरवल्याची वा पळवल्याची (मिसिंग किंवा किडनॅप) नोंद दाखल नव्हती. पण पोलिसांनी मागील महिनाभरात राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान विशेष शोध मोहिमेत अशा ४७ बालकांचा शोध लागला व त्यांची विचारपूस करून त्यांच्या पालकांच्या हवाली केल्यावर बालके व पालकांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवणाऱ्या पथकांनाही हे दृश्य पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले.

मागील डिसेंबर महिन्यात राज्यभरात ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवण्यात आली. नगर जिल्ह्यातही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नोडल अधिकारी बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे, महिला पोलिस नाईक रीना म्हस्के व मोनाली घुटे, महिला पोलिस कॉन्स्टेबल छाया रांधवण व रुपाली लोहारे यांच्या विशेष पथकासह प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त केली होती. या सर्वांनी मिळून एकूण हरवलेल्या व्यक्तींच्या दाखल २३०१ प्रकरणांमध्ये शोध मोहीम राबवून १०११ व्यक्तींचा शोध लावला. सुमारे ४५ टक्के असलेले हे प्रमाण किमान ५० टक्क्याच्यावर जाण्यासाठी येत्या २६ जानेवारीपर्यंत ही ऑपरेशन मुस्कान मोहीम नगर जिल्ह्यात राबवली जाणार आहे, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये 200 लहान मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल असून त्यापैकी 77 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये एकूण 2301 व्यक्ती हरवलेल्या होत्या, त्यापैकी १०11 व्यक्तींचा शोध घेतलेला आहे. 1210 महिलांपैकी 621 व 1091 पुरुषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आलेला आहे. बालके, महिला व पुरुष मिळून 1088जणांचा शोध घेण्यात आला आहे. हा शोध घेताना रेकॉर्ड बाहेरील (पोलिसांकडे नोंद नसलेली) 47 मुले आढळून आली आहेत. त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले आहे.

पोलिस ठाण्यांचा गौरव.. अंमलदारांचाही होणार
ऑपरेशन मुस्कान मोहिमेमध्ये सर्वाधिक चांगले काम करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना गौरवण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे, दुसरा क्रमांक श्रीरामपूर पोलीस व तिसरा क्रमांक श्रीगोंदा पोलीस ठाण्यांना देण्यात आला. उपविभागीय कार्यालय स्तरावर कर्जत उपविभागाने चांगले काम केल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला. या मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचाही आता सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, आयपीएस अधिकारी आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, नोडल अधिकारी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड उपस्थित होते.

त्या महिलेला मिळाला आधार
संगमनेर शहरात एक निराधार महिला रस्त्यावरून जात असताना मुस्कान पथकाने तिची चौकशी केली. तेव्हा तिच्या मानसिक विकलांग स्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर कोणीतरी अत्याचार केल्याचे पथकाच्या लक्षात आले व ती गरोदर असल्याचे आढळून आले. यावेळी पथकाने संबंधित महिलेला दवाखान्यामध्ये नेले व दोन आठवड्यांनंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला व त्याचे नाव दिगंबर असे ठेवले आहे.

प्रेमातून पळवले
शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ऑपरेशन मुस्कानच्या दरम्यान बस स्टॅन्डची तपासणी करीत असताना एक अल्पवयीन मुलगी व प्रौढ मुलगा त्या ठिकाणी आढळून आला. त्यांच्याकडे विचारणा केली असता मुलगी मुंबई येथे असून तिला विनोद चित्ते (वय 21 राहणार शेवगाव) याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले, हे तपासामध्ये निष्पन्न झाले व त्यानंतर मुलीस ताब्यात घेतले. याबाबत पंतनगर पोलीस स्टेशन (मुंबई) येथे गुन्हा नोंद आहे. मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितरित्या दिले आहे, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post