एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरच्या पोलिसांनी तीन गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्या एकाला पकडले. हा सराईत गुन्हेगार असून, त्याला पकडल्याने तब्बल १३ गुन्हे उघडकीस येणार आहेत.
तीन गावठी कट्टे (पिस्तुल) जवळ बाळगणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. नगर जिल्हयात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध अग्नीशस्त्रधारकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार कारवाईचे नियोजन करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली होती. गुंजाळे (ता. राहुरी) येथील पप्पु चेंडवाल हा देशी बनावटीचे गावठी कट्टा पिस्तुल बेकायदेशीर, विनापरवाना स्वतःजवळ बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने कटके यांच्यासह त्यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख व राजेंद्र सानप, तसेच पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, पोलिस नाईक विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, कॉन्स्टेबल रोहित येमुल, मच्छिद्र बडे, विजय धनेधर, मयुर गायकवाड, रविंद्र धुंगासे, उमाकांत गावडे, महिला पोलिस ज्योती शिंदे यांनी मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात खंडोबा मंदिराकडे जाणारे रोडवर सापळा लावला व त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचे नाव पप्पु ऊर्फ अशोक चेंडवाल (वय २४, रा. गुंजाळे, ता. राहुरी. जिल्हा अहमदनगर) असे आहे. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात तीन देशी बनावटीचे गावठी कट्टे पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे असा एकुण ९१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला. तो पंचासमक्ष जप्त करुन त्यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे. पकडलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापुर्वी राहुरी पोलीस स्टेशन, चोपडा ग्रामीण (जिल्हा जळगाव) पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सात तसेच सोनई पोलीस स्टेशन, तोफखाना पोलीस स्टेशन, विरगांव, (ता. वैजापुर, औरंगाबाद) व शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
Post a Comment