मनपा प्रशासन देणार 'त्या' रुग्णालयांना नव्या नोटिसा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवेत असल्याने नगरमधील खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांकडून आकारलेले जादा पैसे त्यांना परत देण्याच्या विषयात मनपा व जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी कडक भूमिका घेण्याऐवजी काहीशी 'ठंडा करके खावो..'.भूमिका घेतली आहे. रुग्णांचे पैसे परत न देणाऱ्या रुग्णालयांना एक संधी देताना रुग्णांचे पैसे परत देता की, तुमच्या दवाखान्याचा परवाना रद्द करू, अशा आशयाच्या नव्या नोटिसा बजावून व त्यावर सुनावणी घेऊन मग अंतिम निर्णय घेण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.

नगर शहरातील १७ खासगी रुग्णालयांतून कोविड रुग्ण दाखल होते. १३९९ रुग्णांना आकारलेल्या बिलांची तपासणी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यापैकी १०९९ प्रकरणांमध्ये बिलांमध्ये त्रुटी आढळल्या. यापैकी १०४० बिले वसुलीसाठी मनपाकडे पाठवली होती. त्यातील ९०२ बिलांच्या १ कोटी १३ लाखाच्या जादा रकमेची वसुली करून ती रक्कम संबंधित रुग्णांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश २९ डिसेंबरला रुग्णालयांना देण्यात आले आहेत. तीन दिवसात ही रक्कम भरण्याचे यात सांगितले होते. पण यावर काही रुग्णालयांनी खुलासा केला तर काहींनी अजूनही केलेला नाही. पैसेही जमा झालेले नाहीत. त्यामुळे या रुग्णालयांकडील वसुलीवरून वादंग सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नगर दौऱ्याच्यावेळी रुग्णांचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी करणारे फलक झळकावण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली व संबंधित रुग्णालयांनी तातडीने पैसे जमा करावेत वा त्यांचा वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द करावा, अशा आशयाच्या नव्या नोटिसा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, करोना काळामध्ये ज्या रुग्णालयांनी अवाजवी बिल घेतले आहे, अशांवर कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र. आता त्यांच्याकडून रुग्णांना देय असलेली रक्कमेची वसुली व आदेशाचे पालन केले नाही म्हणून त्यांचे हॉस्पिटल रजिस्ट्रेशन रद्द का करू नये, यावर त्यांना पुन्हा नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यानंतरच पुढील कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्य़ावर मुंबई नर्सिंग होम अॅक्ट, साथरोग प्रतिबंधक कायदा व अत्यावश्यक सेवा कायदा या तीन कायद्यानुसारच प्रक्रिया करावी लागते. जर त्या रुग्णालयांना नोटिसा देऊन त्यांनी पैसे भरलेले नसतील व त्यांचे वैद्यकीय लायसन रद्द करायचे असेल, तर कायद्यानुसार प्रक्रिया करावी लागते. कोणत्याही परिस्थितीतीत हॉस्पिटलसारख्या सेवा या तात्काळ बंद करता येत नाही. म्हणून आम्ही ज्या रुग्णालयांनी पैसे भरले नाहीत, त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. पैसे जमा करण्याची मुदत त्यात देण्यात आली होती, त्यानुसार रुग्णाच्या खात्यात पैसे ज्यांनी जमा केले नाहीत, त्यांना संबंधित 3 कायद्यानुसार नोटीस बजावून त्यांचे रितसर म्हणणे आम्ही पुन्हा मागवून घेणार आहोत व ते आल्यानंतरच पुढे कोणती कारवाई करायची, यासंदर्भात निर्णय घेतला जाईल,असे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.

रुग्णाकडून जास्त पैसे घेतले म्हणून ती फसवणूक झाली, असे म्हणता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली. अशा फसवणुकीची तक्रार संबंधित रुग्ण करू शकतो, मात्र अवाजवी बिल घेतले म्हणून मनपा प्रशासन त्यांना नोटिसा बजावणार आहे व खुलासा मागवणार आहे. नैसर्गिक न्यायानुसार त्यांनी पैसे भरणे गरजेचे होते. मात्र तसे केले नसेल तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले. आता पुन्हा नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकले जाईल. रिकव्हरी करायची का त्यांचे लायसन्स रद्द करायचे, एवढाच विषय राहिला आहे, असेही भोसले यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातही होणार वसुली

जिल्ह्यातील रुग्णालयांचे सुद्धा असे ऑडिट झाले आहे. त्याची सुद्धा आता सविस्तर माहिती घेऊन नेमके कोणाला नोटीस बजावल्या आहेत व त्याची काय परिस्थिती आहे, याची माहिती तात्काळ घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

मनसे फ्लेक्स आंदोलन स्थगित

पवारांच्या दौऱ्याच्यावेळी बॅनरबाजी करण्याचा मनसेने इशारा दिला होता. मात्र, त्यांनी तो मागे घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, अॅड. अनिता दिघे तसेच मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर भुतारे यांनी आंदोलन मागे घेतल्याचे पत्रकारांना सांगितले. संबंधित रुग्णालयांकडून वसुली करून ती रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतल्याने तसेच मनसे पदाधिकाऱ्यांना पवार यांना भेटण्याची व निवेदन देण्याची परवानगी दिल्याने फ्लेक्स आंदोलन मागे घेतले आहे, त्यामुळे पवार यांना भेटून १४ रुग्णालयांकडील वसुलपात्र रकमेची माहिती त्यांना त्या रुग्णालयांच्या नावानिशी निवेदनाद्वारे देणार आहे, असे भुतारे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post