अण्णांच्या राळेगणसिद्धीत मतदारांना आमिष?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

देशविदेशात लौकिक असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी (ता. पारनेर) गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत दोनजणांना साड्यांचे आमीष मतदारांना दाखवताना पकडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे. पकडलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील पोलिस कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण चौदाशेवर गावांपैकी निम्म्या म्हणजे ७०५ गावांतून ग्रामपंचायत निवडणूक होत असून, त्यात निम्मा जिल्हा म्हणजे तब्बल १४ लाख ६२ हजार ३६२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यामुळे यापैकी कितीजण मतदान करतात, याची उत्सुकता वाढली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पोलिस व प्रशासन सतर्क आहे. याच सतर्कतेतून राळेगण सिद्धी येथे मतदारांना साड्या वाटताना दोघांना पकडण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत सुरेश पठारे तसेच किसन पठारे यांना मतदारांना साड्या वाटताना भरारी पथकाने गुरुवारी सायंकाळी पकडले. दोघांनाही तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्यानंतर पारंपारिक विरोधक असलेले जयसिंग मापारी व लाभेश औटी यांनी हेवेदावे दूर ठेवून बिनविरोध निवड करण्यासाठी नऊ उमेदवारांची नावे निश्‍चित केली. आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राळेगणसिद्धीत झालेल्या बैठकीत बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तबही झाले. त्यानंतर काही तरुणांनी व राजकीय गटांनी परस्पर निर्णय घेतल्याचे तसेच त्यांना विश्‍वासात न घेतल्याची भूमिका घेतली. हजारे यांच्याकडे त्यांनी तशी तक्रार केल्यानंतर लोकशाही पद्धतीने तुम्हीही निवडणूक लढवू शकता, असे हजारे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शामबाबा पॅनलच्या नावाने तरुणांनी निवडणूकीच्या रिंगणात पॅनल उतरविला. मात्र, दोन जागांवर त्यांना उमेदवार देता आले नाही. त्यामुळे बिनविरोध निवडणूक करण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या दोन्ही गटांच्या पॅनलचे दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीचा प्रचार शांततेत पार पडल्यानंतर शुक्रवारी होणा-या मतदानाच्या पार्श्‍वभुमीवर गुरुवारी सायंकाळी मतदारांना साड्या वाटताना सुरेश पठारे व किसन पठारे यांना भरारी पथकाचे अधिकारी व गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी पकडले. पठारे व्दयींसोबत दोन महिलाही होत्या. मात्र, भरारी पथकात महिला कर्मचारी नसल्याने या महिलांना ताब्यात घेण्यात आले नाही. पारनेर येथे दोघांना आणण्यात आल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करण्यात आले. या प्रकरणाची देवरे यांनी पुन्हा शहानिशा केल्यानंतर पठारे व्दयींनी आचारसंहितेचा भंग केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार देवरे यांनी दिले. त्यानुसार दोघा पठारेंविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गावे झाली सज्ज
गाव-कारभारी निवडण्यासाठी ७०५ गावांतून शुक्रवारी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींचे ५ हजार ७८८ सदस्य निवडले जाणार असून, त्यासाठी १३ हजार १९४जण रिंगणात आहेत. २५५३ मतदान केंद्रे असून, यात ५० संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक तसेच कर्मचारी मिळून तब्बल १२ हजार ९००जणांची नियुक्ती या निवडणुकांसाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी ६२ ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या आहेत. त्यामुळे आता ७०५ गावांतून शुक्रवारी मतदानाचा धुराळा उडणार आहे. सोमवारी (१८ जानेवारी) मतमोजणी होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post