भाजपच्या भीतीपोटी महाविकास एकत्र


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भाजपच्या भीतीमुळे राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडी सरकारच्या रुपाने एकत्र आहेत, असा दावा माजी आमदार प्रा. राम शिंदे यांनी केला आहे. पण आमची (भाजप) भीती कमी होणार नाही. बिहार, गुजराथ, कर्नाटक, मध्यप्रदेशातील ५८पैकी ४८ जागा जिंकून देशाचा मूड मोदी आहेत, हे स्पष्ट आहे, असे स्पष्टीकरणही प्रा. शिंदे यांनी आवर्जून दिले.

ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकांनिमित्ताने विशेष मुलाखतीत प्रा. शिंदे बोलत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओबीसी मेळाव्यानिमित्त नगरला आलेले मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपची जिरत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडी राहील, असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देऊन शिंदे म्हणाले, वडेट्टीवार यांच्या वक्तव्यातून भाजपची त्यांना असलेली भीती सिद्ध होत आहे. पण ती कमी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाही. जनतेच्या मनातही त्यांच्याविषयी विश्वास नाही. त्यामुळे हे सरकार टिकणार नाही व जरी टिकले तरी त्यांच्याकडून जनतेचे भले होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

त्यांनी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही टीका केली. ते फक्त पर्यटनासाठी जिल्ह्यात येतात. कोरोना काळात त्यांनी सर्व जबाबदारी प्रशासनावर सोपवली. या काळात ते खूप कमीवेळा जिल्ह्यात आले. जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन मंत्री असताना व बाळासाहेब थोरातांसारखे ज्येष्ठ मंत्री असताना बाहेरचा पालकमंत्री निर्णय घेत नाहीत व ते येथे फक्त पर्यटनासाठी येतात, अशी टीकाही त्यांनी केली. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या आवाहनावरूनही त्यांनी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. गावपातळीवर सौहार्दपूर्ण वातावरणात व आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करीत निवडणुका बिनविरोध झाल्या तर त्याचे स्वागतच आहे. पण लोकप्रतिनिधीकडून आमीष दाखवून, दबाव टाकून बिनविरोध करण्यास भाग पाडणे घटनाविरोधी आहे व एकप्रकारची हुकूमशाही आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post