जरे हत्याकांड : आरोपी बोठेवर टांगती तलवार कायम.. पोलिसांच्या भूमिकेवर 'अटकपूर्व' अवलंबून


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार व मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर त्याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली आहे. पण न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा दिला नाही. सोमवारी (१८ जानेवारी) झालेल्या प्राथमिक सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता पोलिस खंडपीठात काय भूमिका मांडतात, यावर बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय अवलंबून आहे. येत्या २८ रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी खंडपीठात होणार आहे.

जरे यांची हत्या होऊन दीड महिना झाला आहे. पण बोठे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे. तसेच स्टँडींग वॉरंटही न्यायालयाकडून मिळवले आहे. एखाद्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी अशी कायदेशीर प्रक्रिया करण्याच्या या नगर जिल्ह्यातील पहिल्याच घटना आहेत. स्टँडींग वॉरंट राज्यात सर्व पोलिस ठाण्यांना पाठवूनही बोठेचा कोठेही शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोठेने जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने या निर्णयास त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. त्याच्यावतीने अॅड. संतोष जाधवर यांनी ही याचिका दाखल केली आहे. ३१ डिसेंबरला दाखल केलेल्या या याचिकेवर सोमवारी (१८ जानेवारी) प्राथमिक सुनावणी होती. पण न्यायालयाने या याचिकेबाबत पोलिसांना म्हणणे दाखल करण्याचे आदेश दिले. खंडपीठातील सहायक सरकारी वकील व्ही. एस. बडाख यांच्याद्वारे नगरच्या पोलिसांना आता बोठेच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आपली भूमिका न्यायालयासमोर मांडावी लागणार आहे. २८ जानेवारीला बोठेचे व पोलिसांचे म्हणणे न्यायालयासमोर येणार आहे. त्यानंतर न्यायालयाचा निर्णय होणार आहे. मात्र, अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी १० दिवस लांबणीवर गेल्याने बोठेवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Post a Comment

Previous Post Next Post