जरे हत्याकांड : बोठे सापडत नसल्याची 'त्यांना'ही खंत


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे गुन्हा घडल्यापासून अजूनपर्यंत पसार आहे व तो सापडत नसल्याची खंत खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलिसांना बोठेला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

रेखा जरे यांच्या हत्येला आता दोन महिने होत आले आहेत. या पार्श्वभूमीवर जरे यांचा मुलगा रुणाल जरे व जरे कुटुंबियांचे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी सोमवारी सायंकाळी पालकमंत्री मुश्रीफ यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते. यावेळी जरे व पटेकर यांच्याशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी बोठे सापडत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. पण पोलिस त्याला नक्कीच पकडतील, असा विश्वासही व्यक्त केला.

दरम्यान, जरे हत्याकांड प्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकील यादव पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी रुणाल जरे व अॅड. पटेकर यांनी केली. त्यास मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यादृष्टीने आवश्यक कार्यवाहीची ग्वाहीही दिली. यावेळी बोलताना जरे व अॅड. पटेकर यांनी पोलिस तपासाबद्दल समाधान व्यक्त केले. पोलिस अधीक्षक पाटील यांनीही आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती दिली. तसेच पोलिसांचे गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचे तपास काम सुरू असून, वेळ आल्यावर सर्व स्पष्ट करण्याचीही ग्वाही दिली.

येत्या २८ रोजी बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार असून, त्यावेळी नगर पोलिसांना म्हणणे मांडावे लागणार आहे. बोठेच्या या अर्जावर काय निर्णय होतो, याची उत्सुकता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post