जरे हत्याकांड : बोठेची वकिली सनद रद्द करण्याची बार कौन्सिलकडे मागणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याची वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी केली असून, त्यांचे वकील अॅड. सचिन पटेकर यांच्यामार्फत त्यांनी यासंदर्भात बार कौन्सिलला अर्ज पाठवला आहे.

बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे चेअरमन यांना रुणाल जरे व अॅड. पटेकर यांनी यासंदर्भात पत्र पाठवले आहे. अॅड.बाळासाहेब जगन्नाथ बोठे यांची सनद रद्द करून अॅडव्होकेट अॅक्ट १९६१ चे कलम ३५ नुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यात केली आहे. रुणाल भाऊसाहेब जरे यांनी हा अर्ज केला आहे. यात म्हटले आहे की, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळासाहेब ज.बोठेविरुद्ध सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा (रजि.क्र . 1-४७८ / २०२० भादवि कलम ३०२ , १२० ब, आरडब्ल्यू ३४ अन्वये) दाखल झाला असुन त्याच बरोबर सुपारी दिल्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयातील अन्य आरोपी अटक झाले असुन मुख्य सुत्रधार नामे बाळासाहेब ज. बोठे अद्यापपावेतो फरार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ ज.बोठे यांचा अटकपूर्व जामिन जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी फेटाळला आहे. अद्यापपावेतो गुन्हा घडल्यापासुन बोठे हा त्याच्या चतुर व सुड बुध्दीचा वापर करुन फरार झाला आहे. तो अद्यापपावेतो अटक झाला नाही. तसेच त्याचा ठावठिकाणा देखील पोलीसांना सापडत नाही. सदर मुख्य सुत्रधार बाळासाहेब जगन्नाथ बोठे हा अहमदनगर बार असोसिएशनचा सदस्य असुन सदर बाळासाहेब जगन्नाथ बोठे याने बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाच्या निवडणुकाच्यादरम्यान निवडणुक हक्क बजावले असल्याचे निदर्शनास आल्याचे दिसून येते. तसेच अहमदनगर बार असोसिएशनच्या सदस्य लिस्टमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख देखील दिसून येत आहे. जर बाळ ज. बोठे यांचा पूर्वीचा इतिहास पाहिला असता तो थक्क करणारा आहे. त्याच्या इतिहासाचे दाखले आता गुन्हयाच्या स्वरुपात लोकांसमोर येत आहे. गुन्हेगार पार्श्वभुमी असलेला ब्लॅकमेल हा त्याचा एकमेव व्यवसाय आहे. या खुन प्रकरणामुळे संपुर्ण नगर जिल्हाबरोबर संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. तसेच बाळासाहेब जगन्नाथ बोठे याचेविरुध्द वेगवेगळया पोलीस स्टेशनला गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यामध्ये देखील अद्यापपावेतो फरार आहे. तसेच काही गुन्हयांमध्ये बाळासाहेब जगन्नाथ बोठे हे त्यांचे राजकीय दबाव तंत्राचा वापर करून गुन्हे मागे घ्यायला लावले आहे. अशा परिस्थितीत अॅडव्होकेट अॅक्ट १९६१ नुसार कलम ३५ नुसार पनीशमेंट ऑफ ॲडव्होकेट फॉर मिस कंडक्ट केल्याचे दिसुन येते. तसेच बाळासाहेब ज. बोठे यांनी अॅडव्होकेट अॅक्टचे उल्लंघन केलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अॅडव्होकेट अॅक्टप्रमाणे कारवाई होणे महत्वाचे आहे. बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांनी बाळासाहेब ज. बोठे यांना प्रदान केलेली सनद तात्काळ रद्द करण्यात यावी व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अर्जदार नामे रुणाल भाऊसाहेब जरे यांचेमार्फत करण्यात येत आहे. तरी सदरच्या अर्जाचा योग्य विचार विचार करण्यात यावा, ही नम्र विनंती, असे या अर्जात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post