जरे हत्याकांड : पोलिसांना प्रतीक्षा 'त्या' वॉरंटची


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांडाच्या तपासाच्यादृष्टीने मागील दोन दिवस पोलिसांच्यादृष्टीने फारसे काही अनुकूल घडलेले नाही. त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या नव्या आठवड्यात काहीतरी दिलासादायक घडावे, अशी अपेक्षा पोलिसांची असणे साहजिकच आहे. त्यामुळेच आता पोलिसांना प्रतीक्षा आहे ती आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरुद्धच्या स्टँडींग वॉरंटची. याबाबत पोलिसांनी पारनेर न्यायालयात केलेल्या अर्जावर सोमवारी (४ जानेवारी) पोलिस आपली भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर या वॉरंटबाबच्या न्यायालयाच्या निर्णयावर पोलिसांची पुढची तपासाची दिशा ठरणार आहे.

३० नोव्हेंबरला यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची हत्या झाली व त्या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन दिवसात वेगवान हालचाली करीत पाचजणांना पकडले व त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जरेंचा खून सुपारी देऊन झाल्याचे निष्पन्न झाले व ती सुपारी पत्रकार बाळ बोठेने दिल्याचे पोलिसांनी ३ डिसेंबरला जाहीर केल्यानंतर तेव्हापासून पसार असलेला बोठे आता महिना झाला तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो परदेशात पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही बजावली. अनेक ठिकाणी पोलिसांनी त्याचा शोध घेतला आहे. या दरम्यान त्याच्याविरुद्ध रेखा जरे खुनाच्या गुन्ह्याव्यतिरिक्त महिलेचा विनयभंग व महिलेला खंडणी मागण्याचे दोन गुन्हेही दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेऊन त्याचा आय-फोन व अन्य काही वस्तूही जप्त केल्या आहेत. त्याचा सापडलेला आय-फोन पोलिसांना उघडता आला की नाही, हेही अजून स्पष्ट झालेले नाही. मागील महिनाभरापासून अनेक ठिकाणी शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने त्याच्याशी नेहमी संपर्कात असलेल्यांचे जबाब नोंदवले गेले. अशा सुमारे ४०च्यावर जबाब नोंदवले गेले आहेत. पोलिसांनी जरे हत्याकांडाशी संबंधित सारे तांत्रिक व अन्य पुरावे गोळा केल्याचे सांगितले जाते. पण जरे यांची हत्या कोणत्या कारणाने झाली, याचा उलगडा अजूनही पोलिसांना करता आलेला नाही. त्यासाठी त्यांना बोठे हवा आहे, पण तो सापडायला तयार नाही. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्याविरुद्ध स्टँडींग वॉरंट न्यायालयाकडून मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते पोलिसांना मिळाले तर राज्यभरातील व अन्य राज्यातील पोलिसांच्या मदतीने बोठेला शोधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच त्याच्याविषयी माहिती असेल तर पोलिसांना कळवण्याचे आवाहनही जनतेला करता येणार आहे. 

दरम्यान, जरे यांच्या हत्यांकाडाला महिना झाल्यावर ३० डिसेंबरला झालेल्या कँडल मार्च व श्रद्धांजली सभेत जरे कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. पण अन्य उपस्थितांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बोठेला शोधण्याचे आव्हान नव्याने पोलिसांसमोर असणार आहे. त्यात त्यांना आठवडाभरात यश आले नाही, तर विविध राजकीय पक्ष आंदोलनात्मक भूमिकाही घेण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत पोलिसांना स्टँडींग वॉरंटची प्रतीक्षा आहे व त्यामुळे बोठेच्या तपासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post