जरे हत्याकांड : अॅड. निकम किंवा अॅड. पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडाचा खटला सरकार पक्षातर्फे लढवण्यासाठी विशेेेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम अथवा उमेश यादव पाटील यांच्यापैकी कोणाचीही नियुक्ती करण्याची मागणी रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. 

रेखा जरे यांची हत्या होऊन आता जवळपास दीड महिना होत आला असून, या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपी पकडले असले तरी या खुनाची सुपारी देणारा सूत्रधार पत्रकार बोठे सापडत नसल्याने या खुनाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बोठेविरुद्ध आधी लुकआऊट नोटीस जारी केली व नंतर न्यायालयाकडून स्टँडींग वॉरंटही घेतले आहे. नगर जिल्ह्यात एखाद्या आरोपीविरुद्ध या दोन्ही प्रक्रिया घडण्याच्या या पहिल्याच घटना आहेत. मात्र, एवढे करूनही बोठेचा तपास अजूनही लागलेला नाही. तर दुसरीकडे जरे कुटुंबियांमधील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मध्यंतरी जरे यांच्या मुलाने पोलिसांना पत्र देऊन, एखाद्या मंत्र्याने तर बोठेला लपवले नाही ना, अशी शंका उपस्थित केली होती. त्यावर पोलिसांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली नाही. पण तपास सुरू आहे व बोठेला शोधण्यात नक्कीच यश येईल, असा विश्वास जरे कुटुंबाला दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता जरे यांच्या मुलाने तसेच त्यांच्याद्वारे काम पाहणारे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन जरे हत्याकांड खटल्यात सरकार पक्षाचे काम पाहण्यासाठी प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. निकम अथवा अॅड. पाटील यांच्या नियुक्तीची मागणी केली आहे.

आरोपींना फाशीच व्हावी
जरे यांचा मुलगा रुणाल जरे व विधिज्ञ अॅड. सचिन पटेकर यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिले आहे. जरे हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी यात केली आहे. त्यात म्हटले आहे की, रेखा जरे खून प्रकरणामध्ये सुनावणी होण्याकरीता तसेच मुळ फिर्यादींना लवकरात लवकर न्याय मिळून या खुन खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ विशेष सरकारी वकिल अॅड.उज्वल निकम किंवा अॅड.उमेश यादव पाटील यांची नेमणूक व्हावी, अशी मागणीही यात केली आहे. निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, 'यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ ज. बोठेविरुध्द सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयातील अन्य आरोपी अटक झाले असुन मुख्य सुत्रधार बोठे अजून फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन नगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. गुन्हा घडल्यापासुन बोठे फरार झाला आहे. त्याचा ठावठिकाणा देखील पोलीसांना सापडत नाही. त्यामुळे खून प्रकरणाची चौकशी रेंगाळल्याने संशयाला वाव फुटला आहे. हे प्रकरण पुर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. घटना घडून साधारणतः एक ते दीड महिना होवुन देखील अद्यापपर्यंत मुख्य सुत्रधार बोठेला अटक झालेली नाही. बोठे याचा पूर्वीचा इतिहास पाहिला असता तो थक्क करणारा आहे. त्याच्या इतिहासाचे दाखले आता गुन्हयाच्या स्वरूपात लोकांसमोर येत आहेत. गुन्हेगार असलेला बोठेचा ब्लॅकमेल हा त्याचा एकमेव व्यवसाय आहे. या खून प्रकरणामुळे संपुर्ण नगर जिल्हाबरोबर संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेच्या विषय बनला आहे. बोठेचा मोबाईल तपासात जप्त करण्यात आला. त्याच्यामध्ये असणारे कॉल डिटेल हा मुख्य पुरावा ठरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये या खुन खटल्याच्या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी होण्याकरीता तसेच मुळ फिर्यादींना लवकरात लवकर न्याय मिळून जरे खुन खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होणे कामी जेष्ठविधीज्ञ विशेष सरकारी वकिल अॅड.उज्वल निकम किंवा अॅड.उमेश यादव पाटील यांची नेमणूक करावी. तसेच हा खुन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन लवकरात लवकर न्यायनिवाडा करण्यात यावा, अशी मागणी मुळ फिर्यादी व त्यांचे विधीज्ञ अॅड.सचिन पटेकर यांच्यामार्फत शासन दरबारी करण्यात येत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, जरे हत्याकांड प्रकरणातील फरार पत्रकार बाळ बोठे याचा शोध पोलिसांकडून जारी असून, त्याच्याविरुद्धचे स्टँडींग वॉरंट राज्यातील पोलिसांना पाठवल्यानंतर देशातील प्रमुख शहरांतील पोलिसांनाही पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली गेली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post