छत्रपतींच्या सुवर्णसिंहासनासाठी पुढे या; संभाजी भिडे गुरुजींचे नगरमध्ये आवाहन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हिंदुस्थानमधील शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांचे सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापित करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजींनी केले आहे. हिंदवी स्वराज्याचे स्फुल्लिंग ठरलेल्या किल्ले रायगडावर ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन जसे होते, तसेच पुनर्स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ३२ मण सुवर्ण सिंहासन हिंदु तरुण पिढीला स्फूर्ती देण्याकरिता पुनर्स्थापित करणे काळाची गरज आहे, असेही भिडे गुरूजींनी यावेळी आवर्जून सांगितले.

येथील टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालयात धारकरी युवकांशी संवाद साधताना भिडे गुरुजी बोलत होते. या सुवर्ण सिंहासनाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानमधील शिवप्रेमींनी योगदान देण्यास स्वयंस्फूर्तीने पुढे येणे राष्ट्रहिताचे ठरणार आहे, असे भिडे गुरूजी यांनी सांगितले.

भिडे गुरूजी पुढे म्हणाले, भगिरथ प्रयत्नांनी शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्याचा इतिहास घडवला. हा इतिहास जपण्याचे व त्यापासून प्रेरणा घेण्याचे आपणा सर्वांचेच प्रथम कर्तव्य आहे. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. ते त्यांनी साकार केले. हिंदूंना सतत प्रेरणा देत राहील, अशा स्वराज्याची हिमतीने स्थापना केली. किल्ले रायगडावर ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन स्थापना करून केलेला शानदार राज्याभिषेक सोहळा हिंदवी स्वराज्याच्या भगव्याचे तेज दाखवून देणारा ठरला. हिंदूंना सतत प्रेरणा व स्फूर्ती देत राहणारे सुवर्ण सिंहासन किल्ले रायगडावर असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच हे सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा विडा आपल्या सर्वांच्या बळावर उचलला आहे. शिवभक्तांनी सुवर्ण सिंहासनाची उभारणी हेच जीवनाचे लक्ष्य ठेवले तर अल्पावधीत किल्ले रायगडावर ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन विराजमान झालेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यासाठी दर्शन मोहीम
गड-कोटांच्या पायी दर्शनाची मोहीम ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमधून धर्मासाठी प्रेरणा घेण्याकरिताच आखली जाते. यावर्षी २८ ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान विशाळगड व पन्हाळगडचे जवळून दर्शन घेण्यासाठी ही मोहीम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाहीचे उच्चाटन करण्यासाठी अथक कष्ट घेतले. या इतिहासाची आठवण ठेवत नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून अधिकाधिक शिवप्रेमींनी या किल्ले मोहिमेत सहभागी व्हावे. गड-कोट मोहीम ज्ञानाचा प्रकाश लाभण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य योग आचरण्यास प्रेरणा मिळण्यासाठीच आखली जाते. या मोहिमेत सहभागी झालेला प्रत्येक हिंदू धारकरी देव-देश अन् धर्म हे जीवन ध्येय समोर ठेवून वाटचाल करीत राहतो, असे भिडे गुरुजींनी आवर्जून सांगितले. या आढावा बैठकीस श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे नगर जिल्हा प्रमुख बापू ठाणगे तसेच धारकरी विनोद काशीद, संदीप खामकर,अक्षय सुकटकर, अंकुश तरवडे, अमोल हुम्बे, साई भोरे, आशिष क्षीरसागर, महेश जाधव यांच्यासह जिल्ह्यातील धारकरी उपस्थित होते. डॉ. एकनाथ मुंढे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नगर जिल्ह्यातर्फे यावर्षी प्रथमच तयार केलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे भिडे गुरूजींनी कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post