'पवार साहेब.. 'ते' पैसे मिळवून द्या..'; मनसेच्या 'त्या' इशार्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरु


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार येत्या रविवारी (२४ जानेवारी) नगर शहरात येणार असून, येथील सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, 
त्यांचा हा दौरा गाजण्याची चिन्हे आहेत. पवारांच्या या दौऱ्याच्या मार्गावर, पवार साहेब.. खासगी हॉस्पिटल्सने लुटमार केलेल्या वाढीव बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळवून द्या.. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना फ्लेक्सद्वारे करणार आहे. विशेष म्हणजे ज्या हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन पवारांच्या हस्ते होणार आहे, त्या हॉस्पिटलच्याच नावावर सर्वाधिक रक्कम थकविल्याची नोंद आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलिस व मनपा प्रशासनाचीही धावपळ सुरु झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कोरोना काळात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी, यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. पण त्याला फारसे यश आलेले नाही. शहरातील 13 खासगी हॉस्पिटल्सकडून सुमारे 83 लाखांची रक्कम रुग्णांना अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या दौऱ्याच्यावेळी बॅनरबाजी करून रुग्णांची लुटलेली रक्कम त्यांना परत मिळवून देण्याची मागणी थेट पवारांकडेच व तीही जाहीरपणे फ्लेक्सच्या माध्यमातून करण्याचे नियोजन मनसेने केले आहे. रुग्णांकडून घेतलेले जादा पैसे त्यांना परत मिळावेत म्हणून मनपासह जिल्हा प्रशासनालाही निवेदने देण्यात आली व आंदोलनेही करण्यात आली आहेत. पण अजूनही सर्व रुग्णांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. उपजिल्हाधिकारी यांच्या समितीने संपुर्ण बिलांचे ऑडीट करुन आतापर्यंत 13 खासगी हॉस्पिटलकडुन जवळपास 13 लाख रुपये वसुलीचे आदेश महापालिकेला दिले आहेत व त्यानंतर, हे पैसे संबंधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी, आरोग्य अधिकारी यांनी या सर्व हॉस्पिटलला दिले. परंतु हॉस्पिटल्सनी उपजिल्हाधिकारी व महापालिका यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली, असा दावा मनसेचा आहे. वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे महापालिकेनेही कुठल्याही प्रकारची कारवाई या संबंधित हॉस्पिटलवर केली नाही. त्यामुळे मनसेच्यावतीने रविवारी देशाचे सर्वोच्च नेते व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार नगरला येत असल्याने त्यांच्यासमोर हा खासगी हॉस्पिटलच्या वाढीव बिलांचा प्रश्न मनसे ते येणार त्या मार्गावर ''पवार साहेब, गोरगरीब जनतेची कोरोना आजारवरील वाढीव बिलांची रक्कम परत मिळवुन द्या'' अशी मागणी करणारे बॅनर लावणार आहे. 

पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे व शहराध्यक्ष गजेद्र राशीनकर तसेच जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला उपजिल्हाध्यक्ष अॅड. अनिता दिघे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांनी या अभिनव फलकबाजीचे नियोजन केले आहे. मनसेचे शिष्टमंडळ पवार यांना भेटुन यासंदर्भात निवेदन सुध्दा देणार आहेत. कोरोना आजारात गोरगरीब जनतेला सरकारी रुग्णालयात जागा मिळत नव्हते म्हणुन नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले व त्यांच्याकडून लाखो रुपयांची बिले या खासगी हॉस्पिटलवाल्यांनी वसुल केले. शासनाने दिलेल्या कुठल्याही नियमाप्रमाणे या हॉस्पिटलवाल्यांनी बिले दिली नसल्यामुळे गोरगरीब जनतेची लुटमार झाली, असे मनसेचे म्हणणे आहे. 

दरम्यान, या फ्लेक्स बॅनरवर हॉस्पिटल्सच्या नावांसह त्यांनी दिलेल्या वाढीव बिलांची रक्कम छापली जाणार आहे. त्यात ज्या हॉस्पिटलचे उद्घाटन पवारांच्या हस्ते होणार आहे, त्यांचेही नाव असल्याने सामान्यांकडून वाढीव पैसे आकारणार्या व ते परत न करणार्या रुग्णालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार असल्याने मनसेने आक्रमक भुमिका घेतली आहे. ज्या पालकमंत्र्यांनी जादा बिले आकरणार्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश दिले होते, तेही या कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावणार असल्याने या दौर्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दुसरीकडे मनसेच्या इशार्यानंतर जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. पोलिस प्रशासनाने व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणी आज (शनिवारी) मनसे पदाधिकार्यांची बैठकही बोलाविली आहे. आम्ही भूमिकेवर ठाम असून, प्रशासनाने सर्वसामान्यांना लुटणार्याना पाठीशी घालुन आम्हाला रोखण्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई करावी, असे नितीन भुतारे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post