रस्ते दुरुस्तीसाठी उपोषणास्त्र; शिवराष्ट्र सेनेने दिला इशारा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मनपा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीची कामे तातडीने होण्यासाठी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषणाचा इशारा दिला आहे.

नगर मनपा हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील अंतर्गत असलेले आयुर्वेद-अमरधाम रस्ता, आरटीओ ऑफिस येथील रस्ता तसेच शहरातील कलेक्टर कचेरीसह शहरातील विविध भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत तसेच नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरही काही ठिकाणी पडलेले खड्डेही दुरुस्त झाले नाही तर शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषण करण्यात येईल, असे निवेदन मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना देण्यात आले आहे. यावेळी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पितळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून हजारो नागरिक ये-जा करीत असतात. पण, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे दुचाकीस्वारांचे अनेक छोटे-मोठे अपघात रोज होत आहेत. बर्‍याच महिन्यांपासून रस्त्यांची ही दुरावस्था आहे. तसेच रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, श्‍वसनाचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार होत आहेत. यावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन विविध विभागांच्या समन्वयातून या रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

विविध शासकीय विभागात सन्मवय नसल्याने एक रस्ता तयार करतो, तर दुसरा खोदतो, अशी परिस्थिती आहे. काही कामानिमित्त रस्ते खोदलेच तर संबंधित कंत्राटदारांना तातडीने रस्ते पूर्ववत करण्यास सांगितले जावेत, पुढील काही दिवसात रस्त्याची कामे हाती न घेतल्यास शिवराष्ट्र सेनेच्यावतीने उपोषण करण्यात येईल, असे यात म्हटले आहे. यावेळी अंतर्गत रस्त्यांबाबत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्‍वासन डॉ. पठारे यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत बाळकृष्ण चांदणे, सरपंच सचिन चांदणे, गणेश शेकटकर, विनोद चोपडा, किरण वाघ, शुभम ठोकळ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post