मनपाला घ्यावी लागणार पोटनिवडणूक.. छिंदमची याचिका फेटाळली


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा नगर महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरवला आहे. त्यामुळे छिंदमच्या रिक्त झालेल्या जागी नगर महापालिकेला प्रभाग ९ मध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.

नगर महापालिकेचा तत्कालीन भाजपचा नगरसेवक व उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्याने नगर मनपाच्या महासभेने त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव केला होता. नगरविकास विभागानेही हा निर्णय कायम केला होता. त्याला छिंदमने खंडपीठात आव्हान दिले होते. पण खंडपीठाने ते फेटाळले. त्यामुळे छिंदमच्या रिक्त जागी पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नगर महापालिकेच्या शिफारशीवरून त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरविला. खंडपीठात छिंदम याने दाखल केलेली आव्हान याचिका फेटाळत राज्य शासनाच्या कारवाईस योग्य ठरविण्यात आले आहे. नगर महापालिकेत नगरसेवक असलेल्या छिंदमने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेचे अधिकारी अशोक बिडवे यांना शिवीगाळ करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यासंबंधीचे संभाषण सर्वत्र व्हायरल झाले होते. छिंदमविरुद्ध नगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५३, २९४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नगर महापालिकेच्यावतीने विशेष सभा बोलावून २६ फेब्रुवारी २०१८ रोजी छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. संबंधित ठराव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला. राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी त्याचे नगरसेवकपद रद्द केले. यास छिंदमने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. नगरसेवकपद रद्दचा आदेश बेकायदा असून आपणास म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी दिली नसल्याचे त्याचे म्हणणे होते. खंडपीठात सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी राष्ट्रपुरूषाची बदनामी करणारे कृत्य घृणास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिले. गुन्हा दाखल झाल्याने छिंदमला पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. हे समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य असून छिंदमच्या म्हणण्याला कायदेशीर आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. खंडपीठाने शासनाचे आदेश कायम ठेवत बुधवारी (६ जानेवारी) छिंदमची याचिका फेटाळली. नगर मनपातर्फे अॅड. व्ही. डी. होन यांनी बाजू मांडली अॅड. के. एन. लोखंडे यांनी सहाय्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post