शरद पवारांनी टोचले 'सुरभि हॉस्पिटल'सह उपस्थितांचे कान


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्य़ेष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी येथील सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचे उदघाटन केले. पण यावेळी बोलताना त्यांनी सुरभि हॉस्पिटलच्या संचालकांसह प्रशासन व उपस्थित नागरिकांचेही कान टोचले. ''कोरोनामुळे दो गज की दूरी... (सोशल डिस्टन्स) गरजेची आहे. त्यामुळे येथे एवढी गर्दी अपेक्षित नाही, अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, सगळे गर्दी करून अगदी शेजारी शेजारी उभे आहेत'', अशा शब्दात त्यांनी सौम्य भाषेत सर्वांनाच फटकारले. विशेष म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी वैद्यकीय विश्वाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याच क्षेत्रातील एका रुग्णालयाच्या उदघाटनाच्या महोत्सवात त्यांच्याच झालेल्या चुकांची मांडणी करून दिलेल्या या घरच्या आहेराची विशेष चर्चा नंतर रंगली.

येथील औरंगाबाद रस्त्यावरील गुलमोहोर कॉर्नरवर सुमारे अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सुरभि हॉस्पिटलने अल्पावधीत प्रगतीची भरारी घेताना जुन्या हॉस्पिटलशेजारीच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसह नवी सात मजली भव्य वास्तू उभारली आहे. तिचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, माजी आमदार दादा कळमकर व पांडुरंग अभंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवा नेते प्रशांत गडाख आदी उपस्थित होते. या रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांनी स्वागत केले. वैद्यकीय संचालक डॉ. राकेश गांधी यांनी प्रास्ताविकात रुग्णालयाची माहिती दिली. यावेळी बोलताना पवारांनी 'सुरभि'ने अल्पावधीत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. ते म्हणाले, ''आम्ही ज्या क्षेत्रात (राजकीय) काम करतो, तेथे एकत्र राहणे माहीत नाही. गटबाजी करीत राहतो. पण नगरचे हे दर्शन येथील वैद्यकीय क्षेत्राने बदलले आहे. विविध तज्ज्ञ डॉक्टर येथे एकत्र काम करीत आहे. पण डॉक्टर व पेशंट यांच्यात संवाद व रिलेशनशीप महत्त्वाची आहे. डॉक्टर हा कुटुंबातील व्यक्ती वाटला पाहिजे व त्यानेही त्या पद्धतीने वर्तन केले पाहिजे. डॉक्टरबद्दल पेशंटला विश्वास वाटला पाहिजे', असे त्यांनी आवर्जून सांगितले. करोनाबाबत बोलताना ते म्हणाले, थोडी सुविधा व स्थिती बदलली की आपण लगेच आपल्या कामाला लागतो. पण करोनाचा प्रश्न गंभीर होता, अजूनही स्थिती गंभीर आहे. युरोप व इंग्लंडमध्ये पुन्हा कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले आहे. तेथील अर्थव्यवस्था संकटात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे कोरोना आटोक्यात आहे ते केवळ भारतीय व्यक्तीची शरीरांतर्गत प्रतिकार शक्ती पाश्चिमात्य देशांतील नागरिकांपेक्षा चांगली आहे. यामुळे कोरोना काळात आपल्याला यातना कमी झाल्या, पण त्यात समाधान मानले तर संकटाला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरभि हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना व जीवनदायी योजना सुरू करण्याचा अर्ज आरोग्य मंत्र्यांकडे असल्याने त्यांच्याशी चर्चा करून त्याला मंजुरी देऊ. पण त्यानंतर रुग्णांना पैसे मागू नका. गरीबांना सवलत द्या, गोरगरीबांचे आशीर्वाद घेतले तर मजल्यावर मजले चढतील, अशा शब्दात त्यांनी मिश्किल टिपण्णी केली. आ. संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना सुरभिच्या वास्तूमुळे नगर शहराच्या वैभवात भर पडल्याचे गौरवोदगार व्यक्त केले. अमित पवार यांनी आभार मानले.

श्रीरामपूरच्या जर्मन हॉस्पिटलचा केला उल्लेख

पवार यांनी यावेळी बोलताना जिल्ह्यातील एका जुन्या हॉस्पिटलचा आवर्जून उल्लेख केला. एक काळ असा होता की, नगरच्या लोकांना उपचारासाठी बाहेर जावं लागायचं. पन्नास वर्षांपूर्वी नगरमध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर श्रीरामपूर येथे जर्मन हॉस्पिटल होते, तिथे जावे लागायचे. त्याचा लौकिक श्रीरामपूरमध्ये व जिल्ह्यातही अतिशय मोठ्या प्रमाणावर होता. नंतरच्या काळामध्ये वैद्यकीय महाविद्यालय झाली. येथे सुविधा वाढल्या, खऱ्या अर्थाने पूर्णपणाने वैद्यकीय सेवा देण्याची सुविधा जिथे आवश्यकता होती, तिथे आता या सेवा होत चालल्या आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,' असेही पवार म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post