हे तर 'फोटोसेशन' अभियान.. 'जागरूक'चे शुक्रवारी आंदोलन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर शहराचे पुणे महामार्गावरील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या कायनेटिक चौक, सक्कर चौक, स्वस्तिक चौक येथील नागरिकांच्या पैशातून सुमारे 24 लाख रुपये खर्चून उभारलेले सिग्नल गेल्या पाच वर्षापासून गंजून निष्क्रिय आजही तसेच उभे असल्याने त्याचा निषेध या सिग्नल्सला चपलांचा हार घालून करण्यात येणार आहे. येथील जागरूक नागरिक मंचाद्वारे शुक्रवारी (२२ जानेवारी) सकाळी साडेअकरा वाजता हे आगळेवेगळे आंदोलन केले जाणार आहे.

जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी या आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासाठी वाहतूक सुरक्षा अभियानच्या अंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांकडून व लोकप्रतिनिधींकडून केल्या जाणाऱ्या नुसत्या फोटोसेशनच्या फार्सचा निषेध म्हणून मंचातर्फे या आंदोलनाच्या माध्यमातून गांधीगिरी केली जाणार आहे. या चौकातील सर्व बंद सिग्नलला चपलांचे हार घालून त्यावर... ही पहा पाच वर्षापासून बंद असलेल्या सिग्नलची अहमदनगरची शान....आम्ही करतो फक्त फोटोसेशन वाहतूक सुरक्षा अभियान.." अशा आशयाचे फलक त्यावर टांगून जाहीर निषेध केला जाणार आहे.

याबाबत मुळे यांनी सांगितले की, संबंधित अधिकार्‍यांचे व लोकप्रतिनिधींचे देखील वेळोवेळी लक्ष वेधून, निष्क्रिय महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदन देऊन आजतागायत एकदाही कायनेटिक चौक, सक्कर चौक व स्वस्तिक चौक या एका लाईनीत असलेल्या अतिमहत्त्वाच्या रहदारीच्या ठिकाणी पाच वर्षापासून बंद अवस्थेत उभे असलेले, गंजलेले सिग्नल चालू करता येत नाही. वाहतूक पोलीस उभा करता येत नाही. अशा स्थितीत वरिष्ठांनी काहीतरी नाटकी सरकारी अभियान राबवले व याचे फोटोसेशन पुरते सुरक्षा अभियान करून हे अधिकारी व लोकप्रतिनिधी संपूर्ण नगर शहरातील रस्ते व वाहतुकीची भयाण दुर्दशेची वास्तवता लपवून सर्वांचीच फसवणूक करीत आहेत, त्यामुळे याचा जाहीर निषेध करणार आहोत. नुसता वाहतूक सुरक्षा अभियानाचा फोटो झळकावणाऱ्या या निर्लज्ज अधिकाऱ्यांना प्रतिउत्तर म्हणून चपलाचा हार व निषेध फलक लावलेल्या बंद गंजलेल्या सिग्नलचे फोटो, नांगरलेल्या रस्त्यांचे फोटो मुख्यमंत्री, परिवहन मंत्री व आयुक्त, रस्ते व वाहतूक मंत्री, गृह मंत्री यांना पाठवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्यांना चाड व चीड आहे अशा जागरूक नागरिकांनी शुक्रवारी 22 जानेवारीला सकाळी 11.30 वाजता सक्कर चौकातील बंद सिग्नलजवळ फक्त १५ मिनिटांसाठी उपस्थित राहण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post