'तो' दिवस ठरला 'अहमदनगर'चा लौकिक वाढवणारा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मंगळवार १९ जानेवारीचा दिवस दोन ऐतिहासिक घटनांनी अहमदनगर जिल्ह्याचा लौकिक वाढवणारा ठरला आहे. पण या दोन्ही घटनांबाबत जिल्हावासियांचे दुर्लक्ष काहीसे विस्मयजनक ठरल्याचे भाष्य मुंबईत राहणाऱ्या नगर-प्रेमीने केले आहे. अहमदनगर जिल्ह्याबाबत घडलेल्या या दोन्ही घटना सोशल मिडियातून व प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मिडियातून झळकल्या असल्या तरी या दोन्ही घटनांनी  जिल्ह्याचा लौकिक वाढल्याची बाब सोशल मिडियासह अन्य माध्यम जगतातही दुर्लक्षित राहिल्याची खंत या मुंबईकर नगर-प्रेमीने व्यक्त केली आहे.

अंधेरी येथे राहणारे नगरचे प्रेमी डॉ. अनिल पांडे यांनी, १९ जानेवारीला घडलेल्या दोन ऐतिहासिक घटनांमुळे नगर जिल्ह्याविषयी अभिमान वाटला व ऊर भरून आल्याची भावना सोशल मिडियातून व्यक्त केली आहे. ते यात म्हणतात, आमचा अहमदनगर जिल्हा... दिनांक 19 जानेवारी 2021 हा दिवस आमच्या नगर जिल्हाच्यादृष्टीने फारच महत्त्वाचा होता. आपल्या देशात नव्हे तर जगतात ज्याचे कौतुक झाले, तो भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान अजिंक्य राहाणे याच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांच्या मायभूमीत पराभव केला. एक इतिहास रचला गेला. तरुण, पण अनुनभवी यंगीस्थानने ही किमया केली. 33 वर्षांनी ही घटना घडली. हा अजिंक्य राहाणे संगमनेरचा. म्हणजेच नगर जिल्ह्याचा. तसेच नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी लोकसभेच्या खासदारांना याच दिवशी संबोधीत केले. यात त्यांनी गावठी बियाणे व त्यांचे महत्त्व विशद केले. सदृढ भारत बनवायचा असेल तर गावठी बियाण्यांचे जतन करण्यासाठी बियाणे बॅंक भारतात स्थापन झाली पाहिजे. जेणेकरून याचा सर्व देशात प्रसार झाला पाहिजे, असे म्हणणे त्यांनी या मार्गदर्शनात मांडले. एका अडाणी आदिवासी महिलेने लोकसभेतील खासदारांना संबोधन करणे, ही भारतीय संसद इतिहासातील पहिलीच वेळ आहे. यानिमित्ताने एक इतिहास रचला गेला. परंतु याची दखल घेतली गेली नाही व समाज माध्यमातून तसे जाणवले नाही. त्यामुळे वाईट वाटले. असो. या दोन्ही घटना बघून माझा ऊर मात्र भरून आला, असे त्यांचे सोशल मिडियातील या दोन्ही घटनांवरील भाष्य जाणकारांकडून व नगरवर प्रेम करणारांकडून लाईक्स मिळवून गेले आहे.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post