नगर अर्बन : 'त्या' गुन्ह्याची प्रतीक्षा; आंदोलनकर्त्यांचा पाठपुरावा सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत २२ कोटीचा अपहार झाला असल्याने त्यासंदर्भात दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर तक्रार अर्ज पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांना दिला आहे. त्यांच्याकडून सध्या त्याचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा बँकेच्या सभासदांना आहे. तीन दिवसांपूर्वी या मागणीसाठी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्यासमोर सभासदांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेर बँकेचे संबंधित अधिकारी तो गुन्हा दाखल करण्यासाठी पिंपरी-चिंचवडला गेले होते व तेथे त्यांनी तक्रार अर्जही सविस्तर दिला आहे. त्यामुळे आता तो गुन्हा कधी दाखल होतो, याची प्रतीक्षा आहे. आंदोलनकर्त्यांनीही यासाठी पुण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

याआधी बँकेत ३ कोटीचा अपहार झाल्याने त्याचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून काही सभासदांनी प्रशासकांच्या दालनात आंदोलन केले होते व त्यानंतर तो गुन्हा नगरच्या कोतवाली पोलिसात दाखल झाला आहे. त्याचपद्धतीने पुन्हा आंदोलन करून पिंपरी-चिंचवडच्या २२ कोटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बँकेच्या जागरूक सभासदांनी मार्गी लावली आहे. बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, पोपट लोढा, सदाशिव देवगावकर, मनोज गुंदेचा, अतुल भंडारी, बहिरनाथ वाकळे, रवींद्र सुराणा, रुपेश दुगड, राहुल लोढा, अनिल गट्टाणी, ऋषिकेश आगरकर, राहुल लोढा, संजय वल्लाकट्टी, अतुल भंडारी, प्रमोद मोहोळे, मनोज गुंदेचा आदींनी हे आंदोलन केले.

त्यांची मालमत्ता जप्त करा
थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून बँकेची थकबाकी भरून घ्यावी, अशी मागणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी आंदोलनाच्यावेळी केली आहे. ते म्हणाले, नगर अर्बन को-ऑप बँकेच्या चिंचवड ( पुणे) येथील शाखेमध्ये 22 कोटी रुपयांचा अपहार झाला असून या प्रक्रियेत दोन कंपन्यांनी हा अपहार केला असल्याचे उघड झाले आहे. त्याला तत्कालीन संचालक मंडळाची साथ होती. 26 मार्च 2018 ला या कर्जप्रकरणासाठी एका व्यक्तीचे दोन अर्ज आले होते. त्यानंतर दोनच दिवसात संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज मंजूर करण्यात आले. यासाठी रात्री 11 वाजता बँक उघडण्यात आली, असा आरोप गांधी यांनी केला. 22 कोटींचे कर्ज मंजूर करून देताना यातील 11 कोटी रुपये संबंधित पदाधिकार्‍यांनी घेतले, असा दावाही त्यांनी केला. संगनमत करून हा अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, याबाबत वेळोवेळी मागणी करण्यात आली. मात्र, बँक प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याने आंदोलन करावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बँकेच्या शेवगाव शाखेतील 5 ते 6 कोटीच्या बनावट सोने तारण प्रकरणाची फिर्याद देण्यासही टाळाटाळ होत असल्याचा आरोप यावेळी कृती समितीने केला. हा गुन्हा दाखल झाला नाही तर पुन्हा बँकेत आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post