नगर अर्बन बँक अपहार : पोलिसांनी बँकेकडून मागवली कागदपत्रे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेत घडलेल्या ३ कोटीच्या अपहार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने बँकेकडून मागवली आहेत. दरम्यान, शहर सहकारी बँक प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. नीलेश शेळकेच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

नगर अर्बन बँकेत २०१७मध्ये दोन संशयास्पद नोंदींच्या आधारे अडीच कोटी व अन्य ५० लाख मिळून तीन कोटीचा अपहार झाल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात नुकताच दाखल झाला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य, बँकेचे अधिकारी व कर्जदार यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. कोतवाली पोलिसात दाखल झालेला हा गुन्हा आता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे व या विभागाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी आता बँकेकडून मागवली आहेत. ती आल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे. यामध्ये संबंधित संचालकांचे व अधिकाऱ्यांचे जवाब नोंदवले जाणार असल्याचे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी सांगितले.

डॉ. शेळकेच्या कोठडीत वाढ
बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या डॉ.निलेश शेळकेच्या पोलिस कोठडीत 7 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याआधी 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत संपल्यानंतर शेळके याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी डॉ. नीलेश शेळके याला पुण्यातून अटक केली होती. शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी शेळकेविरुध्द सप्टेंबर 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. एकूण 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर सहकारी बँकेशी संबंधित या प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला आहे. त्यामध्ये अनेक बाबी पुढे आल्या आहेत. नेमके पैसे कशा पद्धतीने काढले गेले, याची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. आरोपी शेळकेने ते पैसे कुठे वापरले आहेत, याची आता माहिती घेतली जात आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे याबाबत अधिक माहिती मिळवत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. तसेच फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल देण्यासाठी काही कागदपत्र येणे बाकी आहेत, ती आल्यानंतर तो अहवाल प्राप्त होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post