'व्हीआरडीई'च्या स्थलांतराचा प्रस्तावच नाही : खासदार विखेंचा दावा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर येथील वाहन संशोधन व विकास संस्थेच्या (व्हीआरडीई) स्थलांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे व अहमदनगर येथील व्‍हीआरडीई स्‍थलांतरीत करण्‍याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्ट केले आहे.

नगर येथील व्‍हीआरडीई संस्‍था स्‍थलांतराच्‍या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी दिल्‍लीत व्‍हीआरडीईचे चेअरमन यांचे तांत्रिक सल्‍लागार संजीव कुमार यांच्‍यासह संरक्षण विभागाच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांची भेट घेवून नगर येथील संस्‍था हलविण्‍याच्‍या संदर्भात शहानि‍शा केली. त्‍यानंतर त्‍यांनी या भेटीसंदर्भात माध्‍यमांना माहिती दिली. 

खासदार विखे म्हणाले की, अहमदनगर येथील व्‍हीआरडीई स्‍थलांतरीत करण्‍याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आत्‍मनिर्भर भारत योजनेतून या संस्‍थेचे अधिक मजबुतीकरण करण्‍याची ग्‍वाही व्‍हीआरडीईच्‍या अधिकाऱ्यांनी दिल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासुन या स्थलांतराबाबत सुरु असलेल्‍या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असल्‍याचे त्यांनी सांगितले.

नगर येथील व्‍हीआरडीई संस्‍था स्‍थलांतरीत करण्‍याचा कोणताही प्रस्‍ताव संरक्षण विभागाचा नाही. याबाबत वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सुरु झालेल्‍या चर्चा निरर्थक आहेत. मागील अनेक वर्षांपासून असलेली व्‍हीआरडीई संस्‍था नगर येथेच राहण्‍याबाबत ग्‍वाही देताना भविष्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आत्‍मनिर्भर भारत योजनेतून संरक्षण विभागाच्‍या या संस्‍थेचे अधिक बळकटीकरण करण्‍याचा केंद्र सरकारचा मानस आहे. अन्‍य प्रकल्‍पही नगर येथे देण्‍याबाबतचा विचार व्‍हीआरडीईच्‍या अधिकाऱ्यांनी बोलून दाखविल्‍याने जिल्‍ह्याच्‍यादृष्‍टीने ही अभिमानाची बाब ठरेल, असा विश्‍वास विखे यांनी व्‍यक्‍त केला. तसेच याबाबत नगर येथील व्‍हीआरडीईमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आपण स्‍वत: भेट घेवून याबाबतची माहिती देणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post