संभाजीनगर हे नामांतर नव्हे तर शुद्धीकरण; देसाईंनी केला दावा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

औरंगजेब हा भारतीय नव्हता तर मंगोलियन कुळातील परकीय होता तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे आमचे भूषण व अस्मिता आहे. त्यामुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे नामांतर नाही तर शुद्धीकरण आहे, असा दावा हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजयभाई देसाई यांनी येथे केला. 

अमोल कोल्हे हे केवळ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका केल्याने या दोन नावांच्या महतीवर खासदार झाले, हे विसरले जाऊ नये, असाही दावा देसाई यांनी केला. दरम्यान, सभ्यता, साधना व उपासना पद्धती ही भारतीय संस्कृतीची शक्ती असून, तिच्याविषयी वेबसिरीज, चित्रपट वा अन्य विविध मार्गाने टिंगलटवाळी करून भारताचे सांस्कृतिक हनन करण्याचा देशविरोधी शक्तींचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थानांची टिंगलटवाली करणारे अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांची अशी टिंगलटवाळी करू शकतील काय, असा सवालही केला.

हिंदू राष्ट्र सेनेच्या संघटनात्मक बांधणी दौऱ्यानिमित्त देसाई नगरला आले होते. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप व शिवसेनेवर त्यांनी टीकाही केली. शाहीन बाग आंदोलनाच्यावेळी भाजप सरकारने कठोर भूमिका घेतली नाही व आताही दिल्लीतील शेतकरी आंदोलनात खलिस्तानच्या घोषणा, नक्षली पोस्टर व शेतकरी कमी आणि जिहादी अतिरेकी दिसत असतानाही केंद्र सरकार कठोर भूमिका घेत नाही तसेच महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची असलेली शिवसेना आता सोबतीला कुबड्या घेऊन सत्तेत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी सोडला आहे. पण त्यामुळे त्यांचा राजकीय घातपात होणार आहे. हिंदुत्व विरोधातील त्यांची अनैतिक युती म्हणजे त्यांच्यासाठी विषवल्ली ठरणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

'संभाजीनगर' भाजपच करेल!
औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्याबाबत देसाई म्हणाले, 'तांत्रिकदृष्ट्या वडिलांचे नाव चुकले, तर ते सुधारणे जेवढे मुलाचे दायित्व आहे, तेवढेच महाराष्ट्राला भूषण असणारे संभाजीनगर हे नाव आहे. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर असे शुद्धीकरण गरजेचे आहे,' असे स्पष्ट मत देसाई यांनी मांडले. औरंगाबाद मनपा निवडणुकीत संभाजीनगर हे नाव करण्याचे आश्वासन जो पक्ष देईल व मनपात तसा ठराव करून राज्य सरकारला पाठवण्याची ग्वाही देईल, त्यांना हिंदू राष्ट्रसेना पाठिंबा देईल व हे काम भाजपच करेल, असे वाटते, असा दावा करून ते म्हणाले, भारतीय संस्कृतीचा लवलेश नसलेल्या, भारतीय इतिहासाबाबत सहानभुती नसणाऱ्या आक्रमकांची नावे शहराला असणे हा भारताचा कलंक आहे. ब्रिटिश भारतातून पळून गेले. आपण ब्रिटिशांना नाकारले, त्याचप्रमाणे परकीय आक्रमकांची नावे या देशातून काढून भारतीय संस्कृतीसोबत एकनिष्ठ असणारी नावे असावीत, अशी आमची भूमिका आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये ही प्रक्रिया सुरू केली आहे, तीच महाराष्ट्रात सुरू करावी, यासाठी आम्ही आंदोलनाची पार्श्‍वभूमी तयार करीत आहोत. कारण, उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज नाव हे पूर्वी होतेच. आता अलाहाबादचे प्रयागराज करणे म्हणजे हे नामांतर नाही, तर घुसखोरांची बंडखोरी मोडीत काढून, परकियांचा कलंक पुसून काढून शुद्धीकरण करणे, अशी ती प्रक्रिया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुळात भारतीयांनी औरंगजेबला कधीही बादशहा मानला नाही. त्यामुळे संभाजीनगर असे नाव औरंगाबादला देणे हा आमच्या अस्मितेचा भाग आहे,' असेही देसाई म्हणाले.

'आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. त्यामध्ये औरंगाबादप्रमाणेच उस्मानाबाद, अहमदनगर ही नावाची शृंखला परकियांची जाणवते,' असे सांगतानाच देसाई म्हणाले, 'योगी आदित्यनाथ यांनी जी प्रक्रिया सुरू केली, तीच आता महाराष्ट्रात सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठीच एक आंदोलनाची पार्श्वभूमी आम्ही तयार करीत आहोत. कारण, हा प्रश्न केवळ संभाजीनगरचा नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना देसाई म्हणाले, 'कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्रात दिसले नाही, राजस्थानमध्ये दिसले नाही. ते केवळ पंजाबमध्ये दिसले. मात्र, पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन असताना या आंदोलनात नक्षलवाद्यांची पोस्टर कशासाठी ? शेतकरी त्यांच्या प्रश्नावर बोलले तर ठीक आहे, पण नक्षलवादी पोस्टर घेऊन कसे आले, याचा अर्थ यामध्ये शेतकरी कमी व त्या शेतकऱ्यांच्या मुखवट्यांमध्ये जिहादी अतिरेकी आहेत. हे आंदोलन हायजॅक झाले आहे.', असा दावाही त्यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post