धनंजय मुंडे प्रकरण : खासदार सुजय विखे म्हणतात..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत सध्या राज्यभर सुरू असलेल्या हनीट्रॅप चर्चेबाबत भाष्य करण्यास नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अनुत्सुकता दाखवली. एखाद्याच्या व्यक्तिगत विषयावर टिपणी योग्य नसल्याचा दावाही त्यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात खा. डॉ. विखे शुक्रवारी दुपारी आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत सुरू असलेल्या वादावर बोलताना खा. विखे म्हणाले, मुंडे यांच्याबाबतीत भाजपची पक्ष म्हणून वेगळी भूमिका असेल, आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात. मात्र, एक व्यक्ती म्हणून माझे मत वेगळे आहे. भाजपचा सदस्य नव्हे, खासदारही नव्हे तर व्यक्ती म्हणून मला असे वाटते की, एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवर भाष्य करणे मला संयुक्तिक वाटत नाही. मला जे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, त्याआधारे मी एवढेच सांगतो की त्यावर टीकाटिपण्णी करणे योग्य नाही, असे भाष्य करून खा. विखेंनी याविषयावर पुढे फारसे बोलणे टाळले.

तेथे निवडणूक होणे दुर्दैवी
नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजार व राळेगणसिद्धी येथे नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध न होता यंदा निवडणूक होत आहे. याबाबतही खा.डॉ. विखे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, त्या दोन्ही गावांत निवडणूक घेण्याची वेळ येणे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. देशपातळीवर नगरचे नाव उंचावणाऱ्या दोन महान व्यक्ती या गावांत आहेत. मात्र, आता नवी पिढी राजकारणात आली आहे. आपल्याला संधी मिळत नाही, असे त्यांना वाटू शकते. गावाच्या विकासासाठी काही करण्याची त्यांची इच्छा असेल. त्यांना संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी निवडणूक लढविली तर हरकत नसावी, असेही विखे यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाचा थेट संबंध नसतो. विविध पक्षांच्या नेत्यांना मानणारे कार्यकर्ते एकाच पॅनलमध्ये असू शकतात. त्यामुळे प्रचार पत्रकावर सर्वपक्षीय नेत्यांची छायाचित्रे पाहायला मिळतात. स्थानिक मुद्दे, विचार आणि सोयीनुसार या निवडणुका होतात. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील राजकारणाचा तेथे थेट संबंध नसतो, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

समविचारींना घेणार समवेत
आता सहकारातील निवडणूक होत आहेत. जिल्हा सहकारी बँकेची निवडणूकही समविचारी लोकांना सोबत घेऊन लढविली जाईल, अशी भूमिकाही विखे यांनी मांडली. दरम्यान, नगरच्या व्हीआरडीईच्या स्थलांतराची चर्चा सुरू असल्याने त्यासंबंधी विखे म्हणाले, आपण शनिवारी व्हीआरडीईमध्ये जाऊन कामगार संघटनांना याची माहिती देणार आहे. यासंबंधी आपल्याला कोणी निवेदन दिले नव्हते. मात्र, खासदार या नात्याने आपण दिल्लीत प्रयत्न केले, आता त्याच नात्याने दिल्लीचा निरोप घेऊन कामगारांना भेटणार आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post