'साईबन'ने विकसित केली 'ही' नवी पद्धत


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

थंडीच्या दिवसात खवय्यांना प्रिय असलेला कोवळ्या ज्वारीचा हुरडा नेहमीच्या पद्धतीने खड्ड्यात शेकोटी करून भाजला जातो. पण नगरच्या साईबन पर्यटन स्थळी चक्क मातीच्या रांजणाद्वारे कमीतकमी इंधनात खमंग हुरडा भाजला जातो. नेहमीच्या हुरडा भाजण्याच्या पद्धतीनेच याही पद्धतीने भाजलेल्या हुरड्याची चव असते. त्यामुळे साईबनचा हुरडा सध्या सगळीकडेच खवय्यांचा प्रतिसाद मिळवून जात आहे.

नगर शहरात सध्या थंडी चांगली पडली असून शहराजवळ विविध ठिकाणी हुरडा उपलब्ध आहे. तो भाजण्यासाठी मोठया प्रमाणात शेणाच्या गोवऱ्या लागतात. पण सेंद्रीय शेतीला ओले शेण आवश्यक असते. त्यामुळे यावर उपाय म्हणून नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया यांनी साईबन कृषी पर्यटन केंद्रात हुरडा भाजण्यासाठी इंधन कमी लागावे म्हणून अनोखा प्रयोग केला व तो गेली अनेक वर्षांपासून यशस्वी झाला आहे. त्यांनी हुरडा भाजण्यासाठी मातीचा रांजण उलटा जमिनीमध्ये गाडला व त्याला दोन्ही बाजूंनी खिडक्या ठेवल्या व त्याची भट्टी केली. त्यामधून शेणाच्या गोवऱ्यांऐवजी वाळलेली लाकडे टाकून निखार तयार केला जातो व त्यामध्ये कणसे भाजली जातात व रांजण उलटा ठेवल्याने आणि त्याचे वरचे तोंड छोटे असल्याने सर्व उष्णता वरच्या भागात जमा होते व त्यावर परातीमध्ये तयार हुरडा गरम केला जातो व तो उत्कृष्ट असा चवीला लागतो. साईबनमध्ये वर्षभर वाळलेली लाकडे जमा करून त्याचा वापर इंधन म्हणून केला जातो. त्यामुळे साईबनमध्ये पर्यावरणाचे रक्षण होते व इंधनही वाचते व निसर्गाच्या संपत्तीचे रक्षणही होते. येणारे लोक याकडे कुतूहलाने पाहतात व चौकशी करतात. यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या साईबनमध्ये हुर्ड्याची स्वाद घेण्यासाठी गर्दी होत आहे. हिरवा परिसर, मुलांना आकर्षित करणारी खेळणी व मनोरंजन करणारे प्राणी,आंब्याच्या झाडाखाली वन भोजनाचा आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा, चटण्या, गोडीशेव, रेवडी, गोड-आंबट बोरे, पेरूच्या फोडी व उसाचा रस हे सर्व असलेल्या साईबनमध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे आनंद पर्वणी होऊ लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post