अकोल्यात होणार पिचडांवर शरसंधान? शरद पवारांचा दौरा चर्चेत


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

येत्या रविवारी २४ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, देशाचे माजी संरक्षण आणि कृषीमंत्री व ज्येष्ठ नेते खा. शरद पवार अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येत आहेत. त्यांच्या हस्ते सकाळी १० वा अकोले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार (कै.) यशवंतराव सखाराम भांगरे यांच्या 39 व्या पुण्यतिथी निमित्ताने पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नासांठी शेतकरी मेळावा होणार आहे. यानिमित्ताने कधीकाळी आपले साथीदार असलेले, पण सध्या भाजपवासी असलेले ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यावर शरसंधान पवारांकडून साधले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

पिचडांनी राष्ट्रवादी व पवारांची साथ सोडून भाजपचे कमळ हातात घेतल्यावर पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात पिचडांवर टीका केली होती. त्यानंतर ते येत्या रविवारी अकोल्यात येत असल्याने तसेच सध्या जिल्ह्यात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असल्याने यानिमित्ताने राजकीय चर्चा व शेतकरी मेळाव्यात पिचडांवर टीका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात अकोल्याच्या या दौऱ्यात शरद पवार यांनी पिचडांवर भाष्य केले वा नाही केले तरी तो चर्चेचा विषय मात्र होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या पुढाकाराने शरद पवार यांचा येत्या रविवारी अकोले दौरा होणार आहे. अकोल्याचे माजी आमदार (कै.) यशवंतराव भांगरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी देशाचे नेते खा.शरद पवार अनेक वर्षाच्या कालखंडानंतर शेंडी येथे येत आहे. येत्या २४ जानेवारी रोजी अकोले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार (कै.) यशवंतराव सखाराम भांगरे यांचा 39 व्या पुण्यतिथी सोहळा होत असुन यावेळी माजी आमदार (कै.) यशवंतराव सखाराम भांगरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आदिवासी राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असुन यावेळी आ.अरुणकाका जगताप, आ.रोहीत पवार, आ.किरण लहामटे, आ.आशुतोष काळे, आ.निलेश लंके, आ.दौलत दरोडा, आ.माणिकराव कोकाटे, आ.संग्राम जगताप, आ.हिरामण खोसकर, आ.लहु कानडे यांच्यासह प्रताप शेळके, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अकोले तालुक्यातील शेतकरी-कष्टकऱ्यांचे प्रश्न, पाटबंधारे व सिंचनाचे प्रश्न, तालुक्यातील बंद असलेल्या पाणी योजना यावर चर्चा होणार आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी पवारांकडे केली जाणार आहे. युवा उद्योजक अमित भांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मेळाव्याचे नियोजन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post