नगरमध्ये प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर तिरंगा रॅली; दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नगरमध्ये प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीद्वारे ही रॅली काढली जाणार आहे. दरम्यान, तीन कृषी कायद्यांना स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी नेमलेल्या समितीने आपले काम सुरू केले असून, दिल्लीत प्राथमिक बैठक घेऊन २१ जानेवारीपासून आंदोलक शेतकऱ्यांच्या विविध संघटनांशी संवाद या समितीद्वारे साधला जाणार आहे. या समितीत नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट आहेत.

दिल्ली येथील आंदोलक शेतकरी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाची बैठक नुकतीच मुंबईत होऊन २३ ते २६ जानेवारीदरम्यान मुंबईत आझाद मैदान येथे महापाडाव आणि ध्वजवंदन करण्याचे ठरवले आहे. ज्यांना तेथे जाणे शक्य नाही, त्यांनी आपापल्या गावी, वाडी-वस्ती व शेतात आपल्या ट्रॅक्टरला तिरंगा लावून मी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांसोबत आहे, असे सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे, असे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच नगर येथे झालेल्या बैठकीत २६ जानेवारीला अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आणि अहमदनगर शहरात सकाळी ११ वाजता एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर तिरंगा रॅलीची काढण्यात येणार आहे. येथून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चांदनी चौक, स्टेट बँक चौक, इदगाह मैदान, डीएसपी चौक आणि पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून रॅलीची सांगता होईल. या रॅलीचे नियोजन राज्य कर्मचारी संघटनेचे नेते रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, भाकपचे राज्य सहसचिव अॅड.सुभाष लांडे, माकपचे प्रा.डॉ.महेबुब सय्यद, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, विडी कामगार संघटनेचे अंबादास दौंड, अ.भा.किसान सभेचे अॅड. बन्सी सातपुते, पीस फाउंडेशनचे आर्किटेक्ट अर्शद शेख, ग्रामपंचायत आणि पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अॅड.सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे आदींनी केले आहे. दिल्ली येथे शेतकरी संघटना न्याय्य हक्कासाठी २६ नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. तीन नवीन कृषी कायदे रद्द करणे आणि कामगार, कर्मचारीविरोधी श्रमसंहितेलाला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्य़ासाठी नगरला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. अहमदनगर जवळपासच्या ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांनी आपापल्या ट्रॅक्टरवर तिरंगा लावुन आपली जबाबदारी म्हणून या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना ट्रॅक्टरसह या रॅलीमधे सहभागी व्हायचे आहे, त्यांनी 9765161616 वा 9405401800 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नोंदणी करावी.

समिती साधणार संवाद
सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना स्थगिती देताना नेमलेल्या चार सदस्यीय समितीतून एक सदस्य बाहेर पडले आहेत. मात्र तीन सदस्यांनी समितीचे काम सुरू केले आहे. या सदस्यांमध्ये श्रीगोंदे येथील अनिल घनवट यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या संघटना, व्यापाऱी-व्यावसायिकांच्या संघटनांशी समिती सदस्य २१ जानेवारीपासून प्रत्यक्षात वा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. तीनही कृषी कायद्यांविषयी शेतकरी संघटना सदस्यांचे आक्षेप व भावना जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कृषी कायद्यात बदल हवा आहे, हेही समजून घेतले जाणार आहे. सर्व आंदोलकांशी चर्चा झाल्यानंतर ही समिती आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला देणार आहे, असे घनवट यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post