'या' गावात चक्क 'नोटा' विजयी; प्रतिस्पर्ध्यांचे डिपॉझीट जप्त


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सोलापूर जिल्ह्यातील नरखेड येथील मतदारांनी देशात इतिहास घडवला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 'नोटा' (यापैकी कोणीही नाही) सर्वाधिक मतांनी विजयी झाला. त्याच्या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांचे चक्क डिपॉझीट जप्त झाले आहे. या प्रकाराने या गावची ग्रामपंचायत निवडणूक राज्यात चर्चेत आली आहे. दरम्यान, नरखेडच्या ज्या प्रभागात नोटाला जास्त मते मिळाली, त्या प्रभागात फेर निवडणूक घेण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी या निवडणुकीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पार्टीकडून एका प्रभागात एक उमेदवार म्हणून "नोटा" हाच आपला उमेदवार घोषीत केला होता व त्यालाच मतदान करावे, असे मतदारांना आवाहन केले होते. मतदारांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत देशात इतिहास घडवला व अक्षरश: "नोटा" (४३४ मतदान) ला निवडून दिले. उर्वरित प्रभागातील सर्व उमेदवारदेखील उमेश पाटील यांच्या पार्टीचे निवडून आले.

पाटील यांनी पुढे सांगितले की, नरखेड ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातील उमेश पाटील यांच्या पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवार वृषाली पाटील यांचा उमेदवारी अर्ज संगणकीय चुकीमुळे बाद झाला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे असलेल्या दीपाली कोल्हाळ (१४३ मतदान)व सविता खंदारे (१६३ मतदान) या दोन उमेदवारांपैकी एकालाही निवडून न देता मतदारांनी या प्रभागात "नोटा"ला मतदान करून ग्रामीण भागात देखील मतदार किती जागरूक असू शकतो, याचे संबंध देशासमोर उदाहरण घालून दिले. या प्रभागामधून "नोटा"ला विजयी घोषीत करावे, अशी मागणी उमेश पाटील यांनी केली असून, राज्य निवडणूक आयोगाला तसे पत्र देखील दिले आहे. ६/११/२०१८ रोजी राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेश काढून,"नोटा"ला काल्पनिक उमेदवार घोषीत केले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या ठिकाणी "नोटा"ला सर्वाधिक मतदान झाल्यास, त्या ठिकाणी फेर निवडणूक घेण्याची तरतुद केली आहे. परंतु सदर आदेश २०१८ मधील नगरपालिका निवडणुकीच्या काळात काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हा नियम लागू आहे किंवा नाही, याबाबतीत प्रशासनात संभ्रम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रभाग ५ मधील निवडणुकीत मतदारांनी 'नोटा'ला सर्वाधिक मते दिल्याने यातून रिंगणातील अन्य उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेणे गरजेचे असल्याने या प्रभागात फेरनिवडणूक प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post