मुख्य जलवाहिनीवरच अनधिकृत नळ कनेक्शन्स? नगरसेवक झाले संतप्त

संग्रहीत छायाचित्र

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवरच व्यावसायिक व घरगुती पाणी कनेक्शन्स व तेही अनधिकृत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळणाऱ्या मनपा प्रशासनाविरुद्ध नगरसेवकांनीच संताप व्यक्त केला. प्रामाणिक पाणीपट्टी भरणारांना यामुळे कमी पाणी मिळत असल्याने तातडीने मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन्स काढले नाही तर आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

नगर मनपाच्या प्रभाग 2 मधील म्हणजेच नगर-औरंगाबाद रोडवरील वसंतनगर, रेणुकानगर, तवलेनगर, अभियंता कॉलनी, सूर्यनगर, एस.टी.कॉलनी, हिंमतनगर, लक्ष्मीनगर भागात पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीवर कमर्शियल व घरगुती नळ कनेक्शन अनधिकृतपणे घेतल्याचा दावा या प्रभागाच्या नगरसेवकांनी केला आहे. प्रभाग 2 मधील उपनगरांचा पाणी पुरवठा यामुळे विस्कळीत होत असून, बर्‍याच भागात पाणीच येत नाही. पाणी चोर तुपाशी व नागरिक मात्र उपाशी अशीच परिस्थिती सध्या असल्याने माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार आदिंनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता आर.जी.सातपुते यांची नागरिकांसमवेत बैठक चर्चा केली. यावेळी एकनाथ खिलारी, नानासाहेब दातीर, सूर्यकांत झेंडे, वसंत सरमाने, प्रसाद कदम, प्रसाद कराळे यांनी चर्चेत भाग घेऊन लक्ष्मीनगरसह उपनगरातील पाणी प्रश्‍न हा मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शनमुळे निर्माण झाला असून, तातडीने ही कनेक्शन काढा. आठ दिवसात जर कनेक्शन काढली नाही तर रस्तारोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह नगरसेवकांना दिल्या. अभियंता आर.जी.सातपुते यांनी याबाबत तातडीने पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. माजी नगरसेवक निखिल वारे यांनी मनपाने नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन त्वरित दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांबरोबर आम्हाला देखील तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल. प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणार्‍या लोकांना पाणी मिळालेच पाहिजे. पाणी चोरांवर कठोर कारवाईसाठी मनपाने पावले उचलावी, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post