जरे हत्याकांड : बोठेच्या 'अटकपूर्व'कडे लक्ष; आज खंडपीठात सुनावणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पसार मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी (१८ जानेवारी) सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे पोलिसांसह जरे कुटुंबिक व नागरिकांचेही लक्ष लागले आहे. न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

मागील वर्षी म्हणजे 30 नोव्हेंबर २०२०ला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे हा दीड महिन्यांपासून फरार आहे. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला आहे. मधल्या काळात त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्या निर्णयाविरोधात त्याने खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली आहे. तिची सुनावणी १८ जानेवारीला होणार आहे.

दीड महिन्यापासून बोठे पोलिसांना गुंगारा देत आहे. परंतू, तो मिळून आलेला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यात छापे टाकले. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भक्कम पुरावे गोळा केले असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी बोठे विरोधात पारनेर न्यायालयाकडून स्टँडिंग वॉरंट मंजूर करून घेतले असून हे वॉरंट राज्यातील पोलीस ठाण्यात पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर आता बोठे याने खंडपीठात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post