'नगर अर्बन' मधील 22 कोटींचा कर्ज गैरव्यवहार; भाजपच्या माजी खासदारांसह अनेकांवर गुन्हा दाखल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगरमधील शतक महोत्सवी परंपरा असलेल्या प्रसिद्ध नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील दुसरा गैरप्रकार अखेर उघड झाला आहे. २२ कोटीच्या या कर्जवाटपाबाबतचा तो बहुप्रतीक्षेत असलेला गुन्हा अखेर पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे दाखल झाला आहे. यात संबंधित कर्जदारांसह बँकेची कर्ज उपसमिती तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला आरोपी करण्यात आले आहे. अर्थात संचालक मंडळातील ज्या सदस्यांनी संबंधित २२ कोटीच्या कर्जास मंजुरी दिली, त्यांचा यात समावेश आहे. महिनाभरापूर्वीच बँकेच्या ३ कोटीच्या बोगस कर्ज प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता बँकेच्या चिंचवडच्या शाखेतील गैरप्रकाराबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. आता प्रतीक्षा शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण प्रकरणातील गुन्ह्याची आहे. 

नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत २२ कोटीच्या कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने करून मागच्या आठवड्यात प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्याचवेळी प्रशासक मिश्रा यांनी बँकेचे प्रमुख व्यवस्थापक (वसुली) महादेव साळवे यांना संबंधित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी २१ जानेवारीला चिंचवडला जाऊन सविस्तर तक्रार अर्ज दिला होता. त्याचा अभ्यास केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी २५ जानेवारीला भारतीय दंड संहिता कलम ३४, ४२०, ४६५, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण तसेच मंजूदेवी हरिमोहन प्रसाद, रामचंद्र तांबिले (सर्व रा. चिंचवड), अभिजीत नाथा घुले (रा. बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बँकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे.
चिंचवड पोलिसात दाखल असलेल्या या गुन्ह्याची फिर्याद प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे यांनी दिली आहे. बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या आदेशानुसार ही तक्रार देत असल्याचे त्यांनी यात स्पष्ट केले आहे.

त्यांनी दिलेली सविस्तर तक्रार अशी :
मी नगर अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक (अहमदनगर) या बँकेमध्ये सुमारे 33 वर्षापासून नोकरीस असून सध्या बँकेचे प्रमुख व्यवस्थापक (वसुली ) प्रधान कार्यालय, अहमदनगर येथे कार्यरत आहे. मी काम करीत असलेल्या विभागामध्ये थकीत कर्जाची वसुली करण्याचे काम करतो. आमचे बँकेच्या संपुर्ण महाराष्ट्रामध्ये शाखा आहेत. त्यापैकी एक शाखा सायकर प्लाझामध्ये पॉवर हाउस चौक, चिंचवड, पुणे येथे आहे. सायकर प्लाझामध्ये पॉवर हाऊस चौक, चिंचवड, पुणे या आमचे बँकेचे शाखेमध्ये मे. इंडियन इंजिनिअरींग इंडस्ट्रीज, गणराया आरएल. 52 जी ब्लाक, एमआयडीसी, संभाजीनगर, चिंचवड, पुणेचे भागीदार नामे 1) बबन निवृत्ती चव्हाण, 2 ) सौ.वंदना चव्हाण, 3) यज्ञेश चव्हाण यांनी त्यांचे वरील फर्मचे व्यवसायासाठी दिनांक 26/03/2018 रोजी आमचे वरील शाखेमध्ये 11 कोटी रुपयांचे कर्ज मिळणेसाठी अर्ज केला होता. सदर कर्ज प्रकरणासाठी पिंपरी एमआयडीसी इंडस्ट्रियल एरीया हद्दीतील एच ब्लाक, इंडस्ट्रीयल प्लट नं. ए 71 व ए 72 पैकीचे क्षेत्र 906.00 चौ.मि. व त्यावरील कारखाना शेड 283.97 चौ.मि. तसेच पिंपरी एमआयडीसी प्लट नं. आरएल 52 जी ब्लाक आकुर्डी प्लट क्षेत्र 420 चौ.मि. व त्यावरील 2260 चौ.फुट वरील आरसीसी बंगला, 1183 चौ.फुट बांधकाम या दोन मिळकती त्यांनी बँकेकडे तारण गहाणखत म्हणून ठेवण्याची तयारी ठेवली होती. आमचे बँकेचे वरील शाखेचे व्यवस्थापक यांनी सदरचे कर्ज प्रकरण फाईल मुख्य कार्यालय-अहमदनगर येथे पाठविली होती. मुख्य कार्यालयाने सदरची फाईल ही तपासणीकरीता बँकेचे कर्ज अर्ज छाननी विभागात पाठविली होती. सदर तारण जागेचा सर्च रिपोर्ट बँकेचे वकील नामे ए.एल. पवार यांनी व्हेरीफाय केला. तसेच जागेचे मूल्यांकन बँकेचे व्हॅल्युअर अभिजित नाथा घुले यांनी ठरवून व ज्यासाठी कर्ज पाहिजे आहे, त्या कारणाची शहानिशा कर्ज उपसमिती यांनी करून कर्ज प्रकरणाची फाईल संचालक मंडळाचे सभेपुढे पाठविली असता दिनांक 26/03/2018 रोजी (अर्ज केले त्याच दिवशी) मंजूर करण्यात आली आहे. तसेच वरील कर्ज प्रकरणातील अर्जदारांपैकी 1) बबन चव्हाण, 2 ) सौ.वंदना चव्हाण यांनी मे.नेश लिब टेक्नोरिअल फर्म, प्लट नं. ए-71-72 पिंपरी एमआयडीसी, पुणे या फर्मचे व्यवसायासाठी सायकर प्लाझामध्ये पावर हाउस चौक, चिंचवड, पुणे या आमचे बँकेचे शाखेमध्ये 11 कोटी रुपये कर्ज मिळणेसाठी दिनांक 26/03/2018 रोजी अर्ज केला होता. सदर कर्ज प्रकरणासाठी पिंपरी एमआयडीसी एरीया हद्दीतील एच ब्लाक, इंडस्ट्रीयल प्लट नं. ए ७१ व ए ७२ पैकीचे क्षेत्र 906.00 चौ.मि. व त्यावरील कारखाना शेड 283.97 चौ.मि. तसेच पिंपरी एमआयडीसी प्लट नं. आरएल 52 जी ब्लाक आकुर्डी प्लट क्षेत्र 420 चौ.मि. व त्यावरील 2260 चौ.फुट आरसीसी बंगला, 1183 चौ.फुट बांधकाम या दोन मिळकती त्यांनी बँकेकडे तारण गहाणखत म्हणून ठेवण्याची तयारी ठेवली होती. नमूद कर्ज प्रकरण फाईल मुख्य कार्यालय अहमदनगर येथे पाठविली होती. मुख्य कार्यालयाने सदरची फाईल ही तपासणीकरीता बँकेचे वेगवेगळया विभागात पाठविली होती. त्यानंतर सदर तारण जागेचा सर्च रिपोर्ट बँकेचे वकील नामे ए.एल.पवार यांनी व्हेरीफाय करून जागेचे मुल्यांकन बँकेचे व्हॅल्युअर अभिजित नाथा धुले यांनी ठरवून व ज्यासाठी कर्ज पाहिजे आहे, त्या कारणाची शहानिशा कर्ज उपसमिती यांनी करून कर्ज प्रकरणाची फाईल संचालक मंडळाचे सभेपुढे पाठविली असता ती दिनांक 26/03/2018 रोजी (अर्ज केले त्याच दिवशी) मंजूर करण्यात आली आहे. दिनांक 30/03/2018 रोजी वरील मिळकतींचे रुपये 22 कोटींचे तारण गहाणखत आमच्या बँकेने करून घेतले होते. ते सह दुय्यम निबंधक, हवेली 25, पुणे येथे दस्त क्र. 4700 / 2018 अन्वये नोंद करण्यात आले आहे. दिनांक 31/03/2018 रोजी कर्ज रोखा व इतर कागदपत्रे ही कर्जदार व जामिनदार यांनी बँकेस लिहून दिली आहेत. त्यानंतर आमचे बँकेने मे. नेश लिब टेक्नोरिअल फर्मचे अकाऊंट नं .1044039000002 व 1044077000002 या खात्यात अनुक्रमे 6 कोटी व 5 कोटी रुपये कर्ज रक्कम वर्ग केली होती. तसेच मे. इंडियन इंजिनिअरींग इंडस्ट्रीज या फर्मचे अकाउंट नं.1044039000001 व 1044077000001 या खात्यात अनुक्रमे 6 कोटी व 5 कोटी रुपये कर्ज रक्कम वर्ग केली होती. अशा प्रकारे अर्जदार कर्जदार यांना कर्जाचे 22 कोटी रूपये वर्ग करण्यात आले होते. कर्जाची रक्कम कर्जदार यांचे बँक खात्यात अदा होवूनही व ती कर्जदार यांनी घेवूनही आजपावेतो त्यांनी कर्जाचा एकही हफ्ता भरला नाही. त्याबाबत बँकेने त्यांना वेळोवेळी नोटीस दिल्या होत्या. परंतू त्यांनी एकाही नोटीसला उत्तर दिले नाही व रक्कम भरली नाही. त्यानंतर अभिजित नाथा घुले यांनी आमचे बँकेचे मुख्य कार्यालयास दिनांक 15/07/2020 रोजी अर्ज करून मे.नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनिअरींग इंडस्ट्रीज या फर्मचे कर्ज प्रकरणाचे व्हॅल्यूएशनचे रिपोर्ट मागितले होते, ते त्यांना देण्यात आले होते. त्यानंतर दिनांक 11/8/2020 रोजी अभिजित घुले यांनी तोफखाना पोलीस ठाणे अहमदनगर येथे त्यांचे ऑफिसमध्ये काम करणारा मुकेश चंद्रकांत कोरडे याचेविरुध्द गु.रजि.नं. 6352 / 2020 भादवि कलम 408,465,467,468,471 प्रमाणे फिर्याद दिली असल्याचे समजले. सदर तक्रारीमध्ये आम्ही कर्ज दिलेल्या मे.नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनिअरींग इन्डस्ट्रीज या फर्मला कर्ज देताना तारण म्हणून गहाण ठेवलेली पिंपरी-पुणे येथील मिळकतीचे मुल्य हे 22 कोटी रुपये नसून ते 1,39,67,130 / - रुपये असल्याचे नमूद केले आहे. तेव्हा सदर मुल्यांकन अहवाल आपण तयार केला नसून आपले ऑफिसमध्ये काम करणारा मुकेश चंद्रकांत कोरडे याने बनावट केल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. त्यानंतर आमचे बँकेने वर नमूद दोन्ही कर्ज प्रकरणाचे चौकशीसाठी अॅड.दिपक व्ही.चंगेडे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी चौकशी करून दिनाक 7/09/2020 व दिनांक 14/09/2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी अहवाल दिला. त्यामध्ये त्यांनी बँकेचे मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक यांनी 6.50 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली असताना त्याकडे बँकेचे संचालक मंडळाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून कोणतीही शहानिशा न करता स्वतःचे फायद्यासाठी कर्जदार यांना 22 कोटी रूपये कर्ज मंजूर करून संगनमताने बँकेची अर्थिक फसवणूक केली आहे. तसेच नमूद अहवालामध्ये कर्जदार यांचा सिबील रिपोर्ट पाहता कर्जदारांचे कर्ज घेवून ते थकविणे, कर्ज फेड न करणे अशा सवयीचे असल्यामुळे तसेच कर्जदार यांचेवर विविध बँकाचे कर्ज थकीत असताना त्याबाबत संचालक मंडळाने हेतुपुरस्सर डोळेझाक केली आहे, असा चौकशी अहवाल सादर करून कर्ज प्रकरणासंदर्भात कर्जदार, जामिनदार, कर्ज उपसमिती सभेतील व संचालक मंडळ सभेतील उपस्थित सदस्य यांचेविरुध्द फिर्याद दाखल करावी, असा अहवाल सादर केला आहे. तरी मे. नेश लिब टेक्नोरिअल व मे. इंडियन इंजिनिअरींग इंडस्ट्रीज, पुणे या फर्मचे कर्जदार नामे 1) बबन निवृत्ती चव्हाण 2 ) सौ.वंदना बबन चव्हाण 3 ) यज्ञेश बबन चव्हाण, सर्व रा. गणराया, आर एल 52 जी ब्लाक, एमआयडीसी, संभाजीनगर, चिंचवड, पुणे, जामिनदार नामे सौ.मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा . सी / 5 / 1 एचडीएफसी कॉलनी, एसबीआय बँकेजवळ, शाहूनगर , चिंचवड पुणे) व रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. स.नं .80 / 1 आशिर्वाद , लक्ष्मीनगर नागरी सहकारी पतसंस्था, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे) तसेच तारण मिळकतीचे व्हॅल्युएशन करणारे अभिजित नाथा घुले (रा. यमुना बंगला, बुरुडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमिती सभेतील उपस्थित सदस्य व संचालक मंडळ सभेतील उपस्थित सदस्य यांनी आपसात संगनमत करून स्वतःचे फायद्याकरीता कर्ज प्रकरणामध्ये तारण गहाण मिळकतीचे बनावट मुल्यांकन अहवाल देवून व स्वीकारून बँकेची 22 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. म्हणून माझी वरील नमूद इसमांविरुध्द तक्रार आहे. हा टंकलिखीत केलेला जबाब मी वाचून पाहीला तो माझे सांगणे प्रमाणे बरोबर व सत्य आहे, असे या फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post