'या' नेत्यावर शरद पवारांचा घाणाघात, म्हणाले..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

तब्बल ४० वर्षे आपल्या समवेत राहून भाजपवासी झालेले जुने सहकारी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घणाघाती टीका केली. झारीतील शुक्राचार्याची त्यांना उपमा देताना, त्यांच्यामुळे आपल्याला खाली पाहावे लागते, अशी खंतही व्यक्त केली.

माजी आमदार (कै.) यशवंतराव भांगरे यांच्या अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी (कै.) भांगरेंबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पिचड यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे,आमदार डॉ. किरण लहामटे,आ.गोटीराम पवार,अविनाश आदिक, अरुण कडू,अजय फटांगरे,सुधीर शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार,रावसाहेब म्हस्के,दशरथ सावंत,अजय फटांगरे, मधुकरराव नवले, राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, दिलीप भांगरे, जि प.सदस्य सुनीता भांगरे,अमित भांगरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना सांगितले की, माझ्या साक्षीने अकोले तालुक्यात विकास कामे करण्याचा शब्द दिला आहे, तो शब्द पाळावा. जेथे अडचण (राजकीय) येईल तेथे मला सांगावे, असा सूचक इशारा पिचड यांचे नाव न घेता दिला. ते पुढे म्हणाले, तुम्ही (अकोल्यातील जनता) अनेकदा बोलता की तालुक्यात जुन्या सहका-यांना (पिचड) खूप काही दिले, तेव्हा मला खाली बघावं लागतं, असा उपरोधक टोला लगावत ते म्हणाले, दीड वर्षापूर्वी आमच्या पक्षातील सहकाऱ्यांच्या अचानक अंगात येवू लागले. रोज एक-एक सोडून जावु लागला. मात्र, दिलेले शब्द लोकप्रतिनिधीनी पाळले नाही म्हणून जनतेने परिवर्तन केले, अशी टीका पिचड याचे नाव न घेता त्यांनी केली.

पिचडांवर टीका करताना पवार म्हणाले, अकोलेचा ३५ कोटी रुपयांत उभा राहिलेल्या अगस्ती कारखान्यावर २०० ते २५० कोटी कर्ज करणाऱ्या व कर्जाला जबाबदार असणाऱ्या झारीच्या शुक्राचाऱ्यांना बाजूला हटवा. कारखाना ताब्यात घेऊन वीज, अल्कोहोल व सीएनजीसारखे इतर उत्पादन प्रकल्प उभारून आपण दोन ते तीन वर्षात कारखाना कर्जमुक्त करु, असा विश्वास त्यांनी दिला.

यावेळी बोलताना अशोक भांगरे यांनी तालुक्यातील बंद असलेल्या उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू कराव्यात व पर्यटन विकासासाठी चालना द्यावी, असे सांगितले. युवा नेते अमित भांगरे म्हणाले की, यशवंत युवा फाउंडेशनच्या माध्यमातून भंडारदरा क्षेत्रातील दहा गावे आर्ट व्हिलेज करणार असल्याचे सांगितले. आ .डॉ.किरण लहामटे यांनी तालुक्यातील विविध प्रश्न मांडले व ते सोडविण्यासाठी लक्ष घालण्याचा आग्रह पवार यांच्याकडे धरला. प्रास्ताविक विनोद हांडे यांनी केले. सूत्रसंचालन सुहास वाळुंज यांनी केले तर आभार दिलीप भांगरे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post