अण्णांच्या उपोषणाला राष्ट्रवादीचा पाठिंबा; पालकमंत्र्यांनी केले सुतोवाच


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे येत्या 30 रोजी केंद्र सरकार विरोधात उपोषण आंदोलन करणार आहेत व या आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. तसे सूतोवाच नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केले. अर्थात त्यानंतर थोडे सावरून घेताना ते म्हणाले, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे व हजारेही शेतकऱ्यांसाठी उपोषण करीत आहेत. शेतकर्यांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाला आमचा पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे चर्चा न करता केलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. अण्णा हजारेही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन उपोषण करणार आहेत, त्यामुळे त्यांना आमचे समर्थन आहे. शेतकर्‍यांसाठी लढणारांना आमचे समर्थन असेल, असे ते म्हणाले.

नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडी करून ही निवडणूक लढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. नगर मधील खाजगी रुग्णालयांनी करोना काळात आकारलेल्या वाढीव बिलांचे तसेच या काळात नगरमध्ये झालेल्या मृत्यूबाबत ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्याचा अहवाल आल्यावर आवश्यक कार्यवाही केली जाईल. नगर शहराचे नाव अंबिकानगर करण्याची मागणी होत आहे, परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये हा विषय नाही. तरीही या नामांतराच्या मागणीबाबत संबंधिताची बैठक घेणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, बारामती ऍग्रो कंपनीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबाबत दिलेल्या जाहिरातीसंदर्भात स्पष्ट मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले नाही. कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा त्यातील एक मुद्दा आहे एवढेच भाष्य त्यांनी यावर बोलताना केले.

Post a Comment

Previous Post Next Post