'त्याला' शोधण्यासाठी लाखाचे बक्षीस लावा; वकिलांचेही मोबाईल तपासा : लगड


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे यास शोधून सापडून देणाऱ्यास एक लाखाच्या पुढे बक्षीस जाहीर करावे, अशी मागणी ज्येष्ठ वकील अॅड. सुरेश लगड यांनी केली आहे. तसेच बोठेला मदत करणाऱ्या वकिलांचे कॉल डिटेल्स तपासण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

अॅड. लगड यांनी याआधी बोठेच्या संपत्तीच्या चौकशीसह त्याच्या शैक्षणिक पदव्यांच्या चौकशीचीही मागणी केली आहे. जरे यांची हत्या घडून महिना झाला तरी बोठे सापडत नसल्याने अखेर अॅड. लगड यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आणखी एक पत्र दिले असून, त्यात बोठेला अटकपूर्व जामीन मिळणार नाही याचे प्रयत्न करावेत तसेच बोठेला शोधणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस द्यावे आणि बोठेच्या संपर्कातील वकिलांच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे.

अॅड. लगड यांनी या पत्रात म्हटले आहे की, कुठल्याही परिस्थितीत या मास्टर माईंड आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला पाहिजे असे प्रयत्न केले जावेत. या आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास पोलीस दलाबद्दल समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल तेव्हा विशेष काळजी घेऊन या प्रकरणी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यात आवर्जून नमूद केले आहे. तसेच बोठेला सदर गुन्हा घडताना व घडल्यानंतर गुन्ह्याचे कामी वेळोवेळी मदत करणाऱ्या वकिलांची चौकशी करून तसेच त्यांचे मोबाईल डिटेल्स (सीडीआर व एसडीआर) तपासून चौकशी करावी म्हणजे कोण-कोण यामध्ये सामिल आहेत, हे लक्षात येईल. तसेच बोठे यास शोधुन सापडून देणाऱ्यास एक लाखाच्या पुढे बक्षीस जाहीर करावे. पोलीस दल एरवी अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करत असते. तसे बक्षीस जाहीर केल्यास निश्चितच आपल्या कार्यक्षम अशा पोलीस दलास जनतेतुनही सहकार्य मिळेल, असे मला वाटते आणि एक व्यापक समाजहित लक्षात ठेवुन मी ही विनंतीवजा मागणी आपल्याकडे करत आहे. त्याचा गांभिर्याने विचार करावा, असेही अॅड. लगड यांनी यात आवर्जून नमूद केले आहे.

पत्रकारितेला काळिमा
थोर पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरणार्थ सर्वत्र पत्रकार दिन साजरा केला जात आहे, पण लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या गुन्हेगाराच्या तात्काळ मुसक्या आवळल्याशिवाय गत्यंतर नाही, असे पत्रात स्पष्ट करून अॅड. लगड यांनी म्हटले आहे की, मुख्य सुत्रधार बोठेचा अटकपूर्व जामिन फेटाळण्याबाबत विशेष प्रयत्न करावेत. कारण, या प्रकरणाकडे केवळ अहमदनगर जिल्ह्याचे नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. जरे यांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी मुख्य सुत्रधार बोठे हा फरार आहे. मात्र तो उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अटकपुर्व जामीन अर्ज दाखल करु शकतो, पारनेर न्यायालयात हरकत घेऊ शकतो मग तो आपल्या पोलीस दलाला सापडत कसा नाही? आपण या मुख्य सुत्रधारास शोधुन त्याच्या अटकेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात, यात शंका नाही. आपल्याला कुठल्या मंत्र्याचा दबाव असेल असे मला वाटत नाही. तरी आपण आपले प्रयत्न चालुच ठेवा. आता उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपुर्व जामिन कसा फेटाळला जाईल त्यासाठी आपण डोळ्यात तेल घालुन सरकारी वकिलांना व्यवस्थित संपूर्ण माहिती देऊन जामिन फेटाळला जाईल, असे प्रयत्न करून पोलीस दलाची शान राखावी, असेही आवाहन अॅड. लगड यांनी या पत्रात केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post