जरे कुटुंबिय पडले एकाकी? जिल्ह्यातील नेत्यांचे मौन संशयास्पद


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेला पत्रकार बाळ बोठे पोलिसांना अजूनही सापडत नसल्याने व दुसरीकडे त्याने पारनेर न्यायालयासह अटकपूर्व जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठातही धाव घेतल्याने पोलिस त्याला पुरेपूर 'संधी' देत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, त्याबाबत चर्चा सुरू आहेत. या चर्चेमुळेच रेखा जरे यांचे कुटुंबिय एकाकी पडू लागले आहे. यामुळे आलेल्या उद्वेगातूनच त्यांनी, बोठेला लपवण्यात मंत्र्याचा हात तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली आहे. पण त्यांनी अशी शंका उपस्थित करूनही तसेच जरेंची हत्या होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व मंत्री अजूनही याविषयावर मौन बाळगून आहेत व तेच आता संशयास्पद होऊ लागले आहे.

३० नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर यातील ५ आरोपी पोलिसांनी लगेच दोन दिवसात जेरबंद केले. पण या खुनाचा सूत्रधार पत्रकार बोठेचे नाव ३ डिसेंबरला जाहीर केल्यापासूनच तो गायब झाला आहे. पोलिसांनी छापे घातले, त्याच्या सहकाऱ्यांचे व त्याच्याशी नेहमी संपर्कात असलेल्यांचे जबाबही नोंदवले, बोठेमुळे त्रास झालेल्या महिलांचे विनयभंग व खंडणीचे दोन स्वतंत्र गुन्हेही दाखल करून घेतले आहेत. त्यांचा तपासही सुरू आहे. पण मागील १६ डिसेंबरला जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर आता त्याने औरंगाबाद खंडपीठात त्याला आव्हान दिले आहे. जिल्हा न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने खंडपीठात त्याला आव्हान देईपर्यंतच्या १५ दिवसात पोलिसांकडून त्याला शोधण्याचे कसून प्रयत्न झाले नाहीत, हे यातून स्पष्ट होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर, रेखा जरे यांच्या मुलाने पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले असले तरी मुख्य आरोपी बोठे सापडत का नाही, यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. 

बोठे याला लपविण्यासाठी कोणत्या मंत्र्यांनी ताकद लावली आहे का, असा संशय जरे यांच्या मुलाने व्यक्त केला आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर महिनाभरात केवळ शहराचे आमदार म्हणून संग्राम जगताप यांनीच जरे कुटुंबियांना दिलासा दिला आहे. त्यानंतर मनसेचे देवीदास खेडकर यांच्यासह समाजवादी पक्ष व रिपब्लिकन पक्षाचे काही दुसऱ्या फळीचे नेते आणि ज्येष्ठ वकील अॅड. सुरेश लगड यांनीच बोठेविरोधात विविध चौकशांची मागणी करण्यात पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील अन्य १३ आमदार (दोन विधान परिषदेचे), दोन खासदार व तीन मंत्र्यांनी या घटनेबाबत काहीच भाष्य केलेले नाही. मात्र, आता जरे यांच्या मुलानेच बोठेला एखाद्या मंत्र्याने लपवल्याचा संशय व्यक्त केल्याने जिल्ह्यातील तिन्ही मंत्री म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व नगरविकास-उर्जा विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या प्रकरणातील त्यांची भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. अर्थात राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये ४२ मंत्री असल्याने व त्यांच्यावरही यानिमित्ताने बोठेला मदत केली काय, याबाबत संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय विश्वातून कोणीही दिलासा देण्यास पुढे येत नाहीत व दुसरीकडे पोलिसांकडूनही बोठेचा शोध लागत नसल्याने जरे कुटुंबिय एकाकी पडल्याच्या भावनेत दिसू लागले आहे. त्यातूनच जरेंच्या मुलाने बोठेला शासकीय वरदहस्त आहे का, त्यातून पोलिस यंत्रणेवर दबाव येतोय का, पोलिस यंत्रणा गोंधळळी आहे का, पोलिसातले काही अधिकारी बोठेला मदत करत आहे का, असे सवाल उपस्थित करताना जर बोठे सापडला नाही तर, पोलिस संरक्षणात जरे कुटुंबीय किती दिवस भीतीच्या वातावरणात जगणार?, असा उपस्थित केलेला अंतिम सवालही या परिवाराची अगतिकता स्पष्ट करून गेला आहे.

1 Comments

  1. गेला बाळ कुणीकडे पोलीस शोधत आहेत याला चोहिकडे

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post