जरे हत्याकांड : 'ती' ऑर्डर लांबणीवर.. दुसऱ्या गुन्ह्याचा तपास सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरुद्ध पोलिसांना आवश्यक असलेले स्टँडींग वॉरंट मिळणे लांबणीवर पडले आहे. पारनेर न्यायालयाने याबाबतचा आदेश दोन दिवसांनी देण्याचे स्पष्ट केल्याने पोलिसांना आता येत्या बुधवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, पोलिसांनी बोठेविरोधात दाखल असलेल्या अन्य दोन गुन्ह्यांपैकी खंडणीच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. स्पॉट पंचनाम्यासह विविध जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

जरे यांची हत्या होऊन महिना झाला तरी पोलिसांना अजून या हत्येचा सूत्रधार पत्रकार बोठे पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्टँडींग वॉरंट मिळण्यासाठीचा अर्ज पारनेर न्यायालयात केला आहे. सोमवारी याबाबत निर्णय पोलिसांना अपेक्षित होता. पण न्यायालयाने बुधवारी याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या वॉरंटची प्रतीक्षा पोलिसांना अजून दोन दिवस करावी लागणार आहे. हे वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांद्वारे ते राज्यभरातील पोलिसांना पाठवले जाणार असून, त्यानंतर फरार बोठे जेथे दिसेल, तेथील पोलिस त्याला ताब्यात घेऊ शकणार आहे. याशिवाय त्याच्याविषयी काही माहिती असेल तर पोलिसांना ती देण्याचे आवाहनही जनतेला करता येणार आहे. त्यामुळे आता बोठेला शोधण्यासाठी पोलिसांना आता स्टँडींग वॉरंटवरच आशा लागली आहे. याबाबत पोलिसांनी दाखल केलेला अर्ज व विविध प्रकारचे पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाकडून याबाबत निर्णय देण्यात येणार आहे. बुधवारी किंवा गुरुवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

तोही तपास सुरू

जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बोठे याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यानंतर महिलेचा विनयभंग व महिलेला खंडणी मागण्याचेही अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. महिलेला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याचा तपास हाती घेण्यात आला असून, संबंधित खंडणी मागण्याची घटना घडलेल्या ठिकाणाची पाहणी व पंचनामा तसेच या घटनेशी संबंधितांचे जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे. पोलिसांचे विशेष पथक या कामासाठी नियुक्त केले गेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post