राठोड परिवाराची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवणार; नार्वेकरांनी दिला शब्द


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगरचे शिवसेनेचे माजी आमदार (स्व.) अनिल राठोड यांच्या परिवाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घडवून देणार आहे, असा शब्द शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनिवारी सायंकाळी राठोड कुटूंबियांना दिला. शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नार्वेकर यांनी नगर येथे राठोड कुटुंबीयांची भेट घेतली व राठोड कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी (स्व.) अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, जावई अमोल ठाकूर, विनया ठाकूर, मीरा मिलिंद नार्वेकर, शुभदा मालवणकर उपस्थित होते. नार्वेकर यांनी उपनेते (स्व.) अनिल राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर राठोड परिवार व नार्वेकर यांच्यामध्ये चर्चा झाली.

पत्रकारांशी बोलताना नार्वेकर म्हणाले, उपनेते राठोड यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी यायचे होते. मागील वेळेला काही कारणास्तव येता आले नाही, त्यामुळे आज मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. राठोड यांच्या पत्नी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्हाला भेटायचे आहे, असे सांगितले आहे. त्यासंदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांना (स्व.) राठोडांच्या घरच्यांनी दिलेला निरोप देणार आहे. त्यांचे कुटुंब मुंबई येथे आल्यावर त्यांची व मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देणार आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्याजवळ माझ्या मुलाची काळजी घ्या असेही सांगितले आहे, ही बाबही मी पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, संजय शेडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मदन आढाव, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे, अशोक दहिफळे, दत्ता जाधव,अमोल येवले, गणेश कवडे, काका शेळके, पियुष लोखंडे, विशाल वालकर, रमेश खेडकर यांच्यासह महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, अरुणा गोयल आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post