जरे हत्याकांड : बोठे विरोधात अखेर स्टँडींग वॉरंट जारी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जरे हत्याकांडानंतर दोन दिवसात गायब झालेला पत्रकार बाळ ज. बोठे याला शोधण्यासाठी आता राज्यातील व परराज्यातील पोलिसही मैदानात उतरणार आहेत. यासाठी नगर पोलिसांनी स्टँडींग वॉरंट जारी केले आहे. तशी परवानगी पारनेर न्यायालयाने पोलिसांना दिली आहे. आरोपी बोठे याने या स्टँडींग वॉरंटला घेतलेली हरकत न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता सगळीकडचे पोलिस बोठेला शोधण्याचे काम करू शकणार आहेत.

जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठेविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी झाले आहे व पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर निर्णय दिला आहे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा निर्णय दिला आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. पोलिसांना या वॉरंटमुळे बोठेला राज्यात व अन्य राज्यात पकडणे शक्य होणार आहे. दरम्यान, या वॉरंटमुळे पसार बोठेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होईल असे सांगण्यात येते. त्यामुळे आता त्याला या अर्जावर काय निर्णय होतो, याची आशा असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या व यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रात्री हत्या झाली. या हत्याकांडमध्ये पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. या हत्येमागे मुख्य सूत्रधार बोठे असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तेव्हापासून तो पसार आहे. बोठेच्या शोधासाठी पोलीस महिन्याभरापासून त्याच्या मागावर आहेत. यादरम्यान त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी बोठेविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंटसाठी पारनेर न्यायालयात एक जानेवारीला अर्ज केला होता. बोठे याने या अर्जाला आव्हान दिले होते. अॅड. संकेत ठाणगे यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर म्हणणे मांडले. ठाणगे यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या स्टॅंडिंग वॉरंटविरोधात युक्तिवाद केला. 'बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३१ डिसेंबरला अपील केले आहे. त्यावरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे त्यापूर्वीच पोलिसांनी पारनेर न्यायालयात स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज करणे योग्य नाही. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा आरोपीला अधिकार आहे. तशी कायद्यात तरतूद आहे. त्यावर निर्णय होण्याआधीच स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केला आहे. यातून बोठेला पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे. बोठेला जामीन मिळवून द्यायचा नाही, असेच यातून दिसते आहे. बोठे अटक टाळत नसून, अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि तो त्याला अधिकार आहे', असा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. जरे यांच्या हत्येची घटना घडल्यानंतर पोलिसांनी केलेला तपास तसेच बोठेचा विविध ठिकाणी घेतलेला शोध याची माहिती न्यायालयाला पोलिसांकडून देण्यात आली होती व त्याच्याविरुद्ध स्टँडींग वॉरंट गरजेचे असल्याचे म्हणणे मांडले होते. ते न्यायालयाने मान्य केले आहे व बोठेविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post