जिल्हा बँक निवडणूक : गायकवाड व पानसरे लढतीत दिग्गजांचा लागला कस

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत बिगर शेती संस्था मतदार संघातील प्रशांत गायकवाड व दत्ता पानसरे यांची ठरली. मात्र, प्रत्यक्षात ही निवडणूक या दोन उमेदवारांपेक्षा त्यांच्या पाठीमागे असलेल्या राजकीय ताकदीच्या दिग्गजांचा कस पाहणारी ठरली. यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाजी मारली. जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी तब्बल अकरा तालुक्यातून गायकवाड यांना मताधिक्‍य मिळाले तर पानसरे यांच्यामागे अवघे तीन तालुके राहिले.

बिगर शेती संस्था मतदारसंघातील 1341 मतदारांनी मतदान केले होते. यापैकी चार मते बाद झाली. राहिलेल्या 1337 पैकी 763 मते प्रशांत गायकवाड यांना तर 574 मध्ये दत्ता पानसरे यांना मिळाली. या निवडणुकीत गायकवाड 189 मतांनी विजयी झाले. पूर्ण जिल्हाभरात असलेल्या बिगर शेती संस्था मतदार संघातील मतदान प्रतिनिधींचे मतदान यात होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा सहभागही अप्रत्यक्षपणे होता. विजयी उमेदवार गायकवाड यांच्यामागे संगमनेर व कोपरगाव या दोन तालुक्यांनी मोठी ताकद लावून त्यांना निर्णायक विजयाची आघाडी दिली. बाकी तालुक्यांनी थोडा-थोडा हातभार लावला. गायकवाड यांना अकोले, जामखेड, कर्जत, नेवासा, शेवगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा व श्रीरामपूर या तालुक्यातून आघाडी मिळाली तर पानसरे यांना नगर, पाथर्डी व रहाता या तालुक्यात आघाडी मिळाली. पानसरे यांचा तालुका असलेल्या श्रीगोंदा मध्ये पानसरे दहा मतांनी मागे पडले. पानसरे यांच्या मागे विखे तसेच नगरचे आमदार जगताप पिता-पुत्र, शिवसेनेचे शशिकांत गाडे, शिवाजीराव कर्डिले व पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांची ताकत होती पण गायकवाड यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून सर्वाधिक 100 मतांची आघाडी देऊन जास्त ताकद दिली. याशिवाय कोपरगावला काळे गट, शेवगावचा घुले गट व अन्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गायकवाड यांना ताकद दिल्याने त्यांचा विजय सहजसाध्य झाला.

बिगर शेती संस्था मतदार संघातील उमेदवार प्रशांत गायकवाड व दत्ता पानसरे यांना तालुका निहाय पडलेली मते अशी- अनुक्रमे गायकवाड व पानसरे अशी. अकोले 35 व 22, जामखेड 30 व 16, कर्जत 38 व 25, कोपरगाव 114 व 44, नगर 88 व 128, नेवासा 52 व 31, पारनेर 49 व 29, पाथर्डी 12 व 17, राहता 34 व 97, राहुरी 58 व 42, संगमनेर 164 व 64, शेवगाव 19 व 3, श्रीगोंदा 38 व 28 आणि श्रीरामपूर 32 व 28.

Post a Comment

Previous Post Next Post