जिल्हा बँक निवडणूक : अखेरच्या 'प्रेशर टॅक्टीज'ची रंगत; रणछोडदास करणार निवडणुकीचे चित्र स्पष्ट


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची कामधेनू मानल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील मागील ८-१० दिवस राजकीयदृष्ट्या थंड गेले असले तरी आता आजचा गुरुवारचा (११ फेब्रुवारी) दिवस विशेष घडामोडीचा ठरणार आहे. जिल्ह्यातील काही दिग्गज राजकारण्यांनी एकापेक्षा अधिक मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली असल्याने यापैकी कोणती ठेवायची व कोणती काढायची, याच्या प्रेशर टॅक्टीजला आज वेग येणार आहे व निवडणुकीतून माघार घेणाऱे रणछोडदास निवडणुकीचे चित्रही स्पष्ट करून जाणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी व शेवटच्या क्षणी आता कोणाची कशी अॅडजेस्टमेंट होते, कोण स्वतः उभे राहते व कोठून उभे राहते की कुटुंबातील महिलेला संधी देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ३५७७ मतदान प्रतिनिधी यात मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २१ जागांपैकी ५ जागा म्हणजे राहात्यातून माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, शेवगावमधून माजी आमदार चंद्रशेखर घुले, पाथर्डीतून आ. मोनिका राजळे, जामखेडमधून जगन्नाथ राळेभात व कोपरगावातून विवेक कोल्हे बिनविरोध निवडले गेले आहेत. रिंगणात असलेल्या १९५ उमेदवारांपैकी ३०जणांनी माघार घेतली आहे. आता राहिलेल्या १६ जागांसाठी १६५ उमेदवार रिंगणात आहेत. मागील आठवड्यात श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शेतीपूरक व बिगरशेती या दोन्ही मतदारसंघातून माघार घेतली, पण श्रीरामपूर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघ आणि इतर मागासवर्गीय मतदार संघातील त्यांची उमेदवारी कायम आहे. याशिवाय माधवराव कानवडे यांनी संगमनेर विविध कार्यकारी सेवा संस्था आणि शेतीपूरक संस्था मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतीपूरक संस्था मतदार संघ व अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. मधुकर नवले यांचीही शेतीपूरक व बिगरशेती संस्था अशा दोन मतदार संघात उमेदवारी आहे. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी बिगर शेती व इतर मागासवर्गीय, पांडुरंग सोले यांनी इतर मागासवर्गीय व बिगर शेती मतदार संघ, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी शेतीपूरक व इतर मागासवर्गीय मतदार संघ, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी शेतीपूरक व श्रीगोंदे विविध कार्यकारी सेवा संस्था अशा दोन मतदार संघातून उमेदवारी ठेवली आहे. एकापेक्षा अधिक मतदार संघातून उमेदवारी ठेवण्यातून राजकीय अॅडजेस्टमेंटची संधी घेतली जाण्याची शक्यता आहे. दोनपैकी कोणत्याही एका मतदारसंघातून संधी मिळण्याची आशा या मंडळींना आहे. त्यामुळेच आज राजकीय प्रेशर टॅक्टीज जोरात सुरू होणार आहेत. त्यात कोण कोणावर मात करतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

त्यांचे काय होणार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे हे दोन मंत्री तसेच विद्यमान आमदारांपैकी निलेश लंके, मोनिका राजळे, आशुतोष काळे, अरुणकाका जगताप व संग्राम जगताप हे पाच आमदार आणि माजी आमदारांपैकी शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, वैभव पिचड, पांडुरंग अभंग असे दिग्गज राजकारणी रिंगणात उतरले आहेत. यापैकी विद्यमान आमदार राजळे तसेच म्हस्के, घुले हे दोन माजी आमदार बिनविरोध झाले आहेत तर आ. लंकेंनी माघार घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी माघारीच्या दिवशी राहिलेल्यांपैकी कितीजण रणछोडदास होतात व कितीजण प्रत्यक्ष रिंगणात राहतात, याची उत्सुकता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी बँकेच्या निवडणुकीत एकत्र उतरणार आहेत. महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व असलेल्या शिवसेनेलाही जिल्हा बँकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपच्या कर्डिले गटाला फोडण्याचेही प्रयत्न आहेत. अशा स्थितीत भाजपचा विखे गट एकाकी पडण्याची चिन्हे दिसत होती. पण बिनविरोध निवडल्या गेलेल्या पाच जागांपैकी चार जागांवर विखे व भाजप समर्थक निवडून आले आहेत व याची जोरदार चर्चा राजकीय विश्वात आहे. मात्र, आता आज गुरुवारी घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. यातून ११ फेब्रुवारीनंतरच्या लढती स्पष्ट होणार आहेत व त्यानंतर राजकीय प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post