जिल्हा बँक निवडणूक : भोसलेंमुळे त्यांच्या डोक्यावर भारदस्त फेटे.. पारनेरकरांमध्ये रंगली चर्चा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 17 जागा बिनविरोध होत असताना पारनेरची जागाही अशीच सुटेल, अशी चर्चा असताना शिवसेनेचे रामदास भोसले यांनी उमेदवारी कायम ठेवली व यामुळे पारनेरच्या बड्या नेत्यांनी गृहीत धरलेल्या मतदारांना महत्व आले. त्यामुळे निवडणुकीआधी एक सह मेळावा झाला व प्रत्यक्ष मतदान झाल्यावर मतदारांच्या डोक्यावर भारदस्त भगवे फेटेही झळकले. भोसलेंमुळे हे भाग्य मतदारांच्या नशिबी आले, अशी चर्चा पारनेरमध्ये आता सुरू झाली आहे.

पारनेर तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघाच्या निवडणुकीत बँकेचे विद्यमान संचालक उदय शेळके 93 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या मतदार संघातील एकूण 105 मतांपैकी 99 मते घेऊन शेळके यांनी एकतर्फी विजय मिळवला, पराभूत भोसले याना फक्त 6 मते मिळाली. निवडणुकीचा हा निकाल अपेक्षितच होता. विशेष म्हणजे शेळके याना 96 मते अपेक्षित असताना प्रत्यक्षात 99 मते मिळाली. पण बिनविरोध निवड झाली असती तर मतदारांना कोणी विचारले नसते. किमान ही संधी भोसले यांनी मिळवून दिल्याने बहुतांश मतदारांनी मनातल्या मनात तरी भोसलेंनी धन्यवाद दिल्याचे बोलले जात आहे.

पारनेरच्या निवडणूक निकालाबाबत एक राजकीय निरीक्षकाने विश्लेषण केले आहे. त्यांचे म्हणणे असे होते की, पारनेर मधील परिस्थिती ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच होती. परंतु गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अनेक मतदारांचा भ्रमनिरास झाल्यामुळे विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून कंबर कसली. विरोधकांना माहिती होते समोरचा उमेदवार मोठा ताकदवार आहे. परंतु मतदारांचे नुकसान का करायचं म्हणून निवडणूक लढवली गेली. निवडणूक बिनविरोध झाली असती तर मतदारांना महत्व आले नसते. परंतु शिवसेनेचे रामदास भोसले यांनी निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी कायम ठेवून आव्हान निर्माण करण्याचा देखावा केला. त्यामुळे निवडणूक लागली आणि मतदार रामदास भोसले यांच्यावर प्रचंड खुश झाले. कारण त्यांच्यामुळे अनेकांना लक्ष्मीदर्शन, बाहेरगावी सहल, काहींना बँकेमध्ये नोकरीचा शब्द त्यामुळे अनेक कुटुंबांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अनेकांची मुले वा नातेवाईक नोकरीला लागले तर त्यांचे आशीर्वाद विरोधकांना मिळणार आहे. याचे श्रेय हे विरोधकांना जाते. मतदार म्हणतात जर विरोधकांनी निवडणूक लावली नसती तर आम्हाला फेटे बांधले असते का? सहलीला नेले असते का? कार्यकर्त्यांना निवडणुकीचा आनंद घेता आला असता का? ही निवडणूक कोणत्या पक्षाची किंवा कोणत्या नेत्याची नव्हती. इथे उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आणि पुढार्‍यांनी मजा केली. अनेकांना रोजगार मिळाला त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा फुटला तरी याचा परिणाम इतर राजकारणावर होत नसतो. अनेक मतदार विरोधकांनी समोर पाठविले. कारण आपल्या कार्यकर्त्याला चार पैसे मिळतील. अनेक कुटुंबांना नोकरीचा शब्द मिळेल. पण बिनविरोध झाले असते तर हे झाले असते काय? त्यामुळे मतदार विरोधकांवर खुश आहेत, असा दावा या राजकीय विश्लेषकचा आहे व या विषयाची चांगलीच चर्चा पारनेमध्ये आहे.

Post a Comment

Previous Post Next Post