जिल्हा बँक निवडणूक : 'त्या' गौप्यस्फोटानंतर आरोप-प्रत्यारोपांचा उडणार धुराळा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या ६४ वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक नीरस निवडणूक यंदा होत आहे. निवडणूक होण्याआधी बऱ्यापैकी राजकीय हालचाली सुरू होत्या. राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या पॅनेल विरोधात भाजपचे म्हणजेच विखेंचे पॅनेल उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण नंतर सारेच ओम फस्स झाले. भाजपचा व विखेंचा पॅनेल झालाच नाही. उलट-भाजपचे म्हणवले जाणारे शिवाजीराव कर्डिले, सीताराम गायकर, विवेक कोल्हे व वैभव पिचड महाविकास आघाडीच्या सहमती एक्सप्रेसमध्ये सहभागी झाले. त्यामुळे भाजप व विखेंचा पॅनेल होऊच शकला नाही. या पार्श्वभूमीवर, आता नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्हा बँकेवर २१ फेब्रुवारीच्या निकालानंतर बोलण्याचे व गौप्यस्फोट करण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा पवित्रा म्हणजे आता वरातीमागून घोडे ठरणार आहे.

ज्यावेळी भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागले, तेव्हाच विखेंनी त्यांच्यावर आगपाखड करणे वा त्यांचा पर्दाफाश करणे समजण्यासारखे होते. पण आता निवडणूक झाल्यावर व निकाल लागल्यावर त्यावर भाष्य करणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे होणार आहे. कारण, महाविकास आघाडीच्या सहमत एक्सप्रेसमध्ये बसलेल्यांपैकी सीताराम गायकर व विवेक कोल्हे हे बिनविरोध संचालक झाले आहेत. तर पिचडांनी त्यांच्या अगस्ती कारखाना निवडणुकीत काहीही अडचणी येणार नाहीत, असा शब्द घेतल्याचे समजते. फक्त शिवाजीराव कर्डिले यांनाच या सहमतीचा फायदा केवळ त्यांचे राहुरीतील विरोधक व सहमतीचे प्रमुख प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधामुळे होऊ शकला नाही व कर्डिलेंना आता निवडणूक लढवावी लागत आहे. त्यामुळे निकालानंतरचे विखेंचे यावरील भाष्य भाजपअंतर्गतच आरोप-प्रत्यारोपांना हवा देणारे ठरण्याचीच शक्यता जास्त आहे.

त्यांच्यावर बरसणार?
खा. डॉ. सुजय विखे २१ रोजी बँकेच्या निवडणूक निकालानंतर बोलणार असल्याने ते कर्डीले, पिचड, शिंदे, गायकर, कोल्हे, काळे, ससाणे-मुरकुटे... अशा बहुतांश दिग्गज राजकारण्यांवर बरसण्याची शक्यता आहे. निकाल झाल्यावर जाहीर भाषणात गौप्यस्फोट करतो असे ते म्हणाले आहेत. यंदा भाजपचा स्ट्राँग पॅनल होऊ शकत होता, यासाठी विखे पिता-पुत्र उभे राहणार नव्हते, पण भाजपच्याच लोकांनी त्यांना फसविले, विखेंनी जोर लावून भाजपचे उमेदवार निवडून आणले असते, यंदा भाजपचा अध्यक्ष होण्याची संधी होती, पण या लोकांमुळे ती गेली, असे बहुदा त्यांना सांगायचे असावे. त्यामुळेच आता त्यांच्या २१ तारखेला ते काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post