जिल्हा बँक निवडणूक : 'ते' म्हणताहेत सर्वच पक्षांचे मतदार विकले जातात!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राष्ट्रवादी काय.. काँग्रेस काय.. शिवसेना काय.. व विरोधी भाजप काय.. एकजात सर्व पक्षाच्या मतदारांनी आर्थिक लाभ अथवा नोकरीचे आमिष मिळवल्याशिवाय मतदान केले नाही. सर्वांनी पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवली. त्यामुळे कुठल्याही नेतृत्वाची टिमकी वाजवली तर ते व्यर्थ आहे. सर्वच पक्षांचे मतदार हे विकलेच जातात, हे विदारक चित्र जनतेला व सर्वपक्षीय नेतृत्वाला पाहायला मिळाले व हेही काही थोडे नाही, असे परखड भाष्य जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून निवडणूक लढवलेल्या रामदास भोसलेंनी करून जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. प्रत्यक्षात निवडणुकीत ते पराभूत झाले आहेत. पण त्यानिमित्ताने आलेला राजकीय अनुभव त्यांनी सर्वांशी शेअर केला असून, तो सोशल मिडियातून व्हायरल झाला आहे. या अनुभवाच्या निमित्ताने त्यांनी निवडणुकीत त्यांना दिसलेल्या चित्राचे गांभीर्याने चिंतन सर्वांकडून व्हावे, ही व्यक्त केलेली अपेक्षाही दाद मिळवून जात आहे.

जिल्हा सहकारी बँकेची रणधुमाळी आटोपली असली तरी या निवडणुकीत घडलेल्या विविध राजकीय घटनांमुळे निवडणूक अजूनही चर्चेत आहे. पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात महाविकास आघाडी व सहमती एक्सप्रेसचे उमेदवार उदय शेळके यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे रामदास भोसले पराभूत झाले आहेत. या मतदार संघातील एकूण १०५ मतांपैकी तब्बल ९९ मते शेळकेंना व अवघी ६ मते भोसलेंना पडली आहेत. पण निवडणुकीतील हार-जीत पेक्षा आपल्या उमेदवारीमुळे मतदारांना सत्ताधाऱ्यांकडून मान मिळाला, आश्वासने मिळाली व तेही काही कमी नाही, अशा मानसिकतेत भोसलेंनी पराभव स्वीकारला. पण त्यानिमित्ताने जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत असलेल्या मोजक्या मतदारांची मानसिकता काय असते, हेही स्पष्ट केल्याने तो या मतदारांचे नेते असलेल्यांच्यादृष्टीने मोठा धडा ठरणार आहे.

रामदास भोसले यांनी त्यांना निवडणुकीत आलेल्या अनुभवाचे सविस्तर वर्णन केले आहे. ते म्हणतात, जिल्हा बँक निवडणुकीत पारनेरमध्ये नेमके काय घडले, हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा आहे व म्हणून मुद्दाम वास्तव आपणासमोर मांडत आहे. मी निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वतःहून घेतला. यात पक्ष नेतृत्व किंवा इतर पक्षाचे नेते यांची काहीही भूमिका नव्हती. निवडणुकीचा अर्ज भरला. महाआघाडीची उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. पण, ती मिळणार नाही, हेही माहीत होते. परंतु बँक ठरावावाले मतदार सातत्याने मला संपर्क करून सांगत होते की, भोसलेजी आपण उमेदवारी मागे घेऊ नका. एक तर आपल्यासारखा रोज शेतकऱ्यांचा संपर्क होईल, असा स्थानिक संचालक आम्हाला मिळेल किंवा आम्हाला नोकरी अथवा आर्थिक लाभ तरी होईल. मागील निवडणुकीत म्हणजे पाच वर्षांपूर्वी याच संचालकांनी गावो-गावी सोसायटी संचालकांना निरोप देऊन त्यांना मतदान करतील, अशा कार्यकर्त्यांचे ठराव घेण्यास सांगितले व त्यांना महानगर बँकेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. म्हणून त्यावेळी अनेक मतदारांनी मोठा खर्च करून लिलाव बोली लावून अनुकूल ठराव केले. परंतु असे ठराव झाले म्हणून त्यावेळी उदय शेळके यांना बिनविरोध सोडण्याची भूमिका त्यांचे विरोधी नेतृत्वाने घेतली व मोठा खर्च करून ठराव करणारांची खोड मोडली. याही निवडणुकीत तीच परिस्थिती झाली. बऱ्याच मतदारांनी मतदार होणेसाठी मोठा खर्च केला. म्हणून सर्वांची ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, अशी इच्छा होती. पाच वर्षापूर्वी जे फसले, त्यांना नोकरीही मिळाली नाही व आर्थिक हानीही झाली. त्यांनाही यंदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटत नव्हते. या सर्वांचा फायदा व्हावा, तसेच आपली उमेदवारी राहिली तर निदान त्यांची फसवणूक होणार नाही. ७०-८० गरजू लोकांना नोकऱ्या मिळतील, ज्यांना नोकरीची आवश्यकता नाही त्यांना आर्थिक लाभ भेटेल, या हेतूने व मतदारांची सद्सद विवेक बुद्धी जागी असेल तर आपणाला पण मतदान होईल, या हेतूने मी माझी उमेदवारी शेवटपर्यंत स्पर्धेत ठेवली. परंतु मतदारांचे आमिषासाठी एकही रुपया खर्च करायचा नाही, ही मानसिकता करून ठेवली होती. शेवटी जे व्हायचे तेच झाले. सर्व पक्षांना मानणारे मतदार नोकरी व आर्थिक आमिषाला बळी पडले व सर्वांनी मतदान केले. आता संचालक उदय शेळके यांनी दिलेले शब्द पाळावेत. सर्वांना नोकऱ्या मिळाल्या आणि त्यांचे सर्वांचे प्रपंच उभे राहिले तर त्यातच मी मोठे समाधान झाले, असे समजेन व हे काही कमी नाही, असे भोसलेंनी स्पष्ट करून पुढे म्हटल आहे की, परंतु या निवडणुकीने मला राजकीय नेते व कार्यकर्ते यांचे व निवडणुकीचे विदारक चित्र देखील जनतेसमोर आणता आले. कोणत्याच पक्षाचा सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्षाचा मतदार असो, तो पक्षनिष्ठ राहिलेला नाही, हे वास्तव सर्वांना अनुभवायला मिळाले. शिवसेनेला नावे ठेवण्याचा खटाटोप काही कार्यकर्ते करत आहेत. सत्ताधारी नेतृत्वाचे गोडवे गात आहेत. परंतु वास्तव हे आहे की, हे यश फक्त आणि फक्त प्रलोभन आणि आमिषाचे आहे. राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय, शिवसेना काय व विरोधी भाजप काय.. एकजात सर्व पक्षाचे मतदारांनी आर्थिक लाभ अथवा नोकरीचे आमिष मिळाल्याशिवाय मतदान केले नाही. सर्वांनी पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवली. त्यामुळे कुठल्याही नेतृत्वाची टिमकी वाजवली तर ते व्यर्थ आहे. सर्वच पक्षांचे मतदार हे विकलेच जातात, हे विदारक चित्र जनतेला व सर्व पक्षीय नेतृत्वाला पाहायला मिळाले, हेही काही थोडे नाही. याचेही सर्वांकडून चिंतन व्हावे हीच अपेक्षा. मी मात्र या निवडणुकीत एक रुपयाही खर्च केला नाही. मतदारांचेच घरी प्रेमाने चहा घेत प्रचार केला, हे वास्तव आपणासमोर मांडत आहे. ज्या सहा मतदारांनी मला मतदान करण्याचे औदार्य दाखविले, त्यांचे मनापासुन आभार व्यक्त करतो व या निवेदनातून नकळत माझी काही चूक झाली असल्यास किंवा माझ्या विधानामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला प्रेमाने माफ करतील, हीच अपेक्षा करतो, असे भोसलेंनी यात आवर्जून स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post