माझा विजय म्हणजे रोहित पवारांचा पराभव; अंबादास पिसाळ यांचे सूचक भाष्य चर्चेत


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत कर्जत सेवा संस्था मतदारसंघातून अवघ्या 1 मताने विजयी झालेले उमेदवार अंबादास पिसाळ यांनी कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर रविवारी सूचक शब्दात टीका केली. पवार यांनी निवडणूक हातात घेऊन प्रतिष्ठेची केली होती, असे ते म्हणाले. आपला विजय म्हणजे पवारांचा पराभव, असा त्यांच्या प्रतिक्रियेचा मतितार्थ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर जिल्हा बँकेशेजारी असलेल्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या कार्यालयात नगर तालुका सेवा सोसायटी मतदार संघातून विजयी झालेले कर्डीले व कर्जत सेवा सोसायटी मतदार संघातून विजयी झालेले पिसाळ एकत्र आले. निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल दोघांनी एकमेकांचा सत्कार केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

पिसाळ म्हणाले की, माझी निवडणूक अतिशय चुरशीची होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती व स्वतःच्या हातात घेतली होती. माझ्याकडे मतदार अजिबात नव्हते. मात्र, माझी इच्छाशक्ती होती, विजयी होईल अशी खात्री होती. त्यामुळे आमच्या गावचे ग्रामदैवत सदगुरु गोदड महाराज यांच्या कृपेने मी अवघ्या एक मताने निवडून आलो. याआधी समान मते पडल्याने चिट्ठीवर मी पराभूत झालो होतो. त्यानंतर एका निवडणुकीत 4-5 मतांनी मी निवडून आलो. ही माझी संचालक होण्याची चौथी निवडणूक आहे व आता ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पिसाळ यांनी कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर थेट टिपणी केली नसली, तरी त्यांच्या निवडणुकीत पवारांनी ताकद लावूनही आपण निवडून आलो. हे स्पष्ट करताना एकप्रकारे पवारांचा पराभव केल्याचे सूचक भाष्य त्यांनी केल्याने माझा विजय म्हणजे पवारांचा पराभव, असेच त्यांना म्हणायचे असावे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post