जिल्हा बँक निवडणूक : अखेर कर्डिले 'एकला चलो रे' भूमिकेत

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला व विखेंना डावलून मंत्री थोरातांच्या सहमती एक्सप्रेसमध्ये बसलेल्या राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनाच आता प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आल्याने त्यांनी एकला चलो रे भूमिका घेतली आहे. मंत्री थोरातांच्या सहमती एक्सप्रेसमध्ये राहुरीचे आमदार व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेही आहेत. पण राहुरीच्या राजकीय संघर्षात कर्डिले त्यांचे विरोधक असल्याने कर्डिलेंना बिनविरोध करण्यास त्यांचा सकारात्मक प्रतिसाद नव्हता. परिणामी, सहमती एक्सप्रेसमधील अन्य नेतेही कर्डिलेंबाबत काही करू शकले नाही व दुसरीकडे विखेंना सोडले असल्याने त्यांनीही कर्डिलेंबाबत अलिप्तता स्वीकारल्याने अखेर कर्डिलेंना मैदानात उतरावे लागले आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या ४ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होत असून, कर्डिले यांनी स्वतःसाठी कपबशी चिन्ह घेताना अन्य तीन जागांवरील आपल्या व सहमती एक्सप्रेस समर्थक उमेदवारांनाही कपबशी चिन्ह घेऊन या चौघांचे स्वतंत्र पॅनेल केले आहे. आता या पॅनेलबाबत विखेंची काय भूमिका आहे, हे प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळीच स्पष्ट होणार आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. या निवडणुकीत थोरात समर्थक विरुद्ध विखे (भाजप) समर्थक असा सामना रंगण्याची चर्चा होती. पण भाजपचे कर्डिले, वैभव पिचड, विवेक कोल्हे व सीताराम गायकर यांनी थोरातांच्या गटात सहभाग घेतला. त्याचा फायदा गायकर व कोल्हेंना बिनविरोध निवडीतून झाला. तसेच पिचड यांनी माघार घेतली असली तरी अगस्ती कारखाना निवडणुकीत अडचणी येऊ देणार नसल्याचा शब्द त्यांना दिला गेल्याचे समजते. चौघांपैकी तिघांचे असे कल्याण होत असताना या चौघांचे नेतृत्व करणारे खुद्द कर्डिलेच मात्र अधांतरी राहिले. सहमती एक्सप्रेसद्वारे त्यांच्या नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातील त्यांची जागा बिनविरोध करण्याचेही नियोजन होते. पण तनपुरेंनी विरोध केल्याने व दुसरीकडे विखेंनीही पाठ फिरवल्याने कर्डिले एकाकी पडले. त्यांची जागा बिनविरोध झाली नाही. त्यांच्याविरोधात सत्यभामाबाई बेरड यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची वेळ कर्डिलेंवर आली आहे. जिल्हा बँकेसाठी उमेदवारी दाखल करताना त्यांच्या मतदार संघातील १०९ मतदारांपैकी तब्बल १०० मतदार त्यांनी समवेत आणले होते व ते सर्वजण आपल्यासमवेत असल्याचा दावाही केला होता. त्यामुळे त्यावेळी विरोधकांकडे अवघी ९ मते असल्याचे दिसले होते. आता प्रत्यक्ष मतदानात विरोधकांना किती मते पडतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तनपुरे समर्थक कर्डिलेंची किती मते फोडतात, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

पॅनेल झाले तयार
नगर तालुका विकास सोसायटी मतदार संघातील उमेदवार शिवाजीराव कर्डिले, कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार मीनाश्री साळुंके व पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार उदय शेळके यांच्यासह बिगरशेती मतदार संघातील उमेदवार प्रशांत गायकवाड या चौघांनी पॅनेल केले असून, सर्वांनी कपबशी चिन्ह घेतले आहे. त्यांच्याविरोधात उभे असलेल्यांपैकी अनुक्रमे नगर मतदार संघात सत्यभामाबाई बेरड यांनी छत्री हे चिन्ह तर कर्जतमध्ये अंबादास पिसाळ, पारनेरला रामदास भोसले व बिगरशेतीमधील दत्ता पानसरे यांना विमान चिन्ह मिळाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post