जिल्हा बँक निवडणूक : 'सहमती'मध्ये खुद्द कर्डिलेच लटकले? '१७ बिनविरोध'चा घडला इतिहास


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा बँकेचे नेतृत्व केलेल्या पूर्वसूरींनी राजकीय पक्षांचे जोडे बाहेर काढून ठेवून बँकेचा कारभार केला व तीच परंपरा आताही पुढे न्यायची आहे, असे सांगत बहुचर्चित सहमती एक्सप्रेसमध्ये बसलेले भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले स्वतःच्या बाबतीत मात्र सहमती करण्यात अपयशी ठरले. स्वतःची जागा त्यांना बिनविरोध करताच आली नाही. दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल १७ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. याचे कारण कोरोनामुळे सर्व दिग्गज राजकारण्यांना व कारखानदार मंडळींना आलेली आर्थिक अडचण म्हणायची की, 'एकमेका साह्य करू.. अवघे धरू सुपंथ' हा सहकाराचा मूलमंत्र जपत 'एकमेकांना सांभाळून' घेण्याची रणनीती म्हणायची, हा चर्चेचा विषय झाला आहे.

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. उर्वरित 4 जागासाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. गुरुवारी (११ फेब्रुवारी) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा बँकेच्या परिसरात जिल्हाभरातील राजकीय नेते व त्यांच्या समर्थकांची जत्रा भरल्याची स्थिती होती. या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या वाहनांमुळे नगर-पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती. २१ जागांसाठी १९५जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ३०जणांनी १० फेब्रुवारीपर्यंत माघार घेतली तर राहिलेल्या १६५ अर्जांपैकी तब्बल १४०जणांनी अखेरच्या दिवशी रणछोडदास होणे पसंत केले. या मैदान सोडून पळू पाहणाऱ्यांची आधी मनधरणी, मग राजकीय तडजोडी अशा चर्चेच्या फेऱ्या रंगत होत्या. दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांची यासाठीची धावपळ नजरेत भरत होती. सव्यापसव्य करीत माघार घेणारांच्या कागदावर सह्या झाल्या आणि मग बड्या नेत्यांनी सुटकेचे निःश्वास सोडले व बँकेचे इतिहासातच प्रथमच 17 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची पहिलीच घटना घडली.

कर्डिलेंसाठी सहमती कुचकामी
राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांसमवेत जिल्हा भाजपमधील माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाला समवेत घेऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहमती एक्सप्रेस बँकेच्या निवडणुकीत राबवली जाणार होती. त्यामुळे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे व त्यांचे समर्थक एकाकी पडले. कर्डिले यांनी वैभव पिचड, सीताराम गायकर व विवेक कोल्हे यांच्या समवेत थोरातांनी संगमनेरला आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थिती लावली. पण या चौघांपैकी तिघांबाबत सहमती झाली. कर्डिले मात्र लटकले. समर्थक गायकर यांना बिनविरोध करणे व भविष्यातील अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीतील अडचणी दूर करण्याच्या शब्दावर पिचड यांनी माघार घेतली.त्यानुसार गायकर व विवेक कोल्हेही बिनविरोध झाले. पण कर्डिले बिनविरोध होऊ शकले नाही. राहुरी तालुक्याचे तनपुरे विरुद्ध कर्डिले राजकारण त्याला अडचणीचे ठरले म्हणतात. त्यामुळेच आता कर्डिलेंना निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. कर्डिले-तनपुरे वादात सहमती एक्सप्रेसच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व भाजपच्या विखे गटानेही अलिप्तता दाखवल्याचे दिसू लागले आहे.

बिनविरोधमध्ये नऊ नवे चेहरे
जिल्हा बँकेच्या १७ बिनविरोध उमेदवारांमध्ये ९ नवे चेहरे बँकेच्या राजकारणात आले आहेत.आ. आशुतोष काळे, विवेक कोल्हे, अमित भांगरे, अमोल राळेभात या तरुण चेहऱ्यांना काही ज्येष्ठ नवे शिलेदारही राजकीय मार्गदर्शनाला आले आहेत. बिनविरोध झालेले मतदार संघ निहाय उमेदवार असे- सेवा सोसायटी मतदार संघ- अकोले - सीताराम गायकर, जामखेड - अमोल राळेभात, कोपरगाव - विवेक कोल्हे, नेवासा - शंकरराव गडाख, पाथर्डी - आमदार मोनिकाताई राजळे, राहाता - अण्णासाहेब म्हस्के, राहुरी- अरुण तनपुरे, संगमनेर - माधवराव कानवडे, शेवगाव - चंद्रशेखर घुले, श्रीगोंदा - राहुल जगताप, श्रीरामपुर - भानुदास मुरकुटे. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ - अमीत भांगरे. इतर मागासवर्ग मतदार संघ- करण ससाणे. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ- गणपतराव सांगळे. शेती पूरक प्रक्रिया मतदार संघ - आमदार आशुतोष काळे. महिला प्रतिनिधी मतदार संघ - अनुराधा नागवडे व आशा तापकीर.

८ जणांसाठी निवडणूक
कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघात अंबादास पिसाळ व मीनाश्री साळुंके, नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघात शिवाजीराव कर्डिले व सत्यभामा बेरड आणि पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघात उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात लढती होत आहेत. तसेच बिगर शेती संस्था मतदार संघात प्रशांत गायकवाड व दत्ता पानसरे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. या आठजणांमुळे ४ जागांवर आता निवडणूक होणार आहे.

भाजपचे पॅनेल बारगळले
राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे काही नेते थोरात गटात सामील झाल्याने भाजपचे पॅनल बारगळले. मंत्री थोरात यांच्याकडून विखे यांची कोंडी करण्यात आल्याचे दिसून आले. या निवडणुकीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार राधाकृष्ण विखे या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे नगरमध्ये तळ ठोकून होते. तर दुसरीकडे विखे गटाचे कार्यकर्ते सुद्धा नगरमध्ये होते. जिल्हा बँकेची येत्या 20 रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी निवडणूक होईल, असे प्रारंभी चित्र होते. मात्र, नंतरच्या कालावधीत सहमती एक्सप्रेस धावू लागली. राधाकृष्ण विखे यांचा भाजपचा पॅनल करण्याचा प्रयत्न होता. मात्र, भाजपचे कोल्हे, राजळे, कर्डिले, गायकर हे थोरात गटाबरोबर गेल्याने भाजपचे पॅनल बारगळले. त्यामुळे बिनविरोधसाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे मागील एक-दोन दिवसांपासून राजकीय घडामोडी घडत होत्या. दिग्गज नेत्यांकडून बिनविरोधसाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र 17 जागा बिनविरोध करण्यात यश आले. तर आता चार जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगताप पिता-पुत्रांची माघार
राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार अरुणकाका जगताप व नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी बिगर शेती संस्थांच्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अखेरच्या दिवशी या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. जगताप यांनी का माघार घेतली व त्यांना काय शब्द मिळाला, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

यशवंत कॉलनी व विळद घाटात रणनीती
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यशवंत कॉलनी येथील आमदार आशुतोष काळे यांच्या बंगल्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गटाची तर विळद घाटात आमदार राधाकृष्ण विखे गटाची बैठक झाली. या दोन्ही ठिकाणावरून निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येत होती. मंत्री थोरात व मंत्री तनपुरे हे आशुतोष काळे यांच्या बंगल्यावर होते. त्या ठिकाणाहून उमेदवारांशी चर्चा केली जात होती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होते.

पिचडांची माघार चर्चेत
माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अनुसूचित जाती व बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांची ही माघार चर्चेची झाली आहे. अकोले तालुक्यात पिचड यांना थांबविण्यात आले असले तरी त्यांना अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत मदत करण्याचा शब्द देण्यात आल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post