जिल्हा बँक निवडणूक : विखेंची पिछेहाट चर्चेत


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मोठा राजकीय गट मानल्या जात असलेल्या विखे गटाचे अवघे दोनच संचालक निवडून आल्याने या गटाच्या झालेल्या पिछेहाटीची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय विश्वात आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहमतीच्या राजकारणात भाजपचे नेते आपल्याकडे वळवताना विखेंना मात्र एकटे पाडले. बिनविरोध निवडणुकांतून तसा संदेश देत असताना प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या चार जागांपैकी दोन जागांवर विखे गटाला असलेली आशाही धुळीस मिळवण्यात थोरातांना यश आले आहे. त्यामुळेच आता विखे यांचा पवित्रा काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत २१ रोजी निवडणूक निकालानंतर भाष्य करण्याचे सांगितले होते. त्यामुळे आता या भाष्यासाठी त्यांना कधी मुहूर्त मिळतो की, अनपेक्षित अपयशामुळे ते भाष्य टाळतात काय, याची उत्सुकता वाढली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यावर नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विरोधात विखे गट असा सामना रंगण्याची अपेक्षा होती. यादृष्टीने राजकीय हालचालीही गतिमान होत्या. यादरम्यान विखेंनी स्वतःच्या गटासह स्वपक्षीय म्हणजे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांची एकत्रित मोट बांधून स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचे सुतोवाच केले होते. विखेंसह कर्डिले व प्रा. राम शिंदे हे तिघेजण या पॅनेलचे नेतृत्व करणार होते. पण नंतर कर्डिले, सीताराम गायकर, वैभव पिचड व विवेक कोल्हे यांनी थोरातांची भेट घेऊन त्यांच्या सहमती मोहिमेत सहभाग घेतला. तर प्रा. शिंदेंनी जामखेडच्या निवडणुकीपुरता सहभाग घेतला आणि विखे गट एकाकी पडण्यास सुरुवात झाली. बँकेच्या २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यात विखे गटाचे केवळ अण्णासाहेब म्हस्केच निवडून आले. जामखेडचे अमोल राळेभात, अकोल्याचे सीताराम गायकर, कोपरगावचे विवेक कोल्हे, पाथर्डीच्या आ. मोनिका राजळे हे वरकरणी भाजपचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते सहमती मोहिमेचे यशवंत-गुणवंत आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या ४ जागांपैकी कर्जतचे अंबादास पिसाळ हेच फक्त विखे समर्थक आहेत. नगर तालुक्याचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे असले तरी सहमती मोहिमेत होते. पण ऐनवेळी त्या सहमती एक्सप्रेसनेही त्यांना वाऱ्यावर सोडल्याने ते स्वबळावर लढले व विजयी झाले. तर पारनेरला सेनेचे रामदास भोसले व बिगर शेती मतदार संघात दत्ता पानसरे यांना विखेंनी ताकद देऊनही त्यांचे दारूण पराभव झाले. त्यामुळे बँकेच्या २१ संचालकांमध्ये विखेंचेच म्हणावे असे म्हस्के व पिसाळ असे फक्त २ संचालक दिसत आहेत. अर्थात आता बँकेच्या सत्तेची गणिते जुळवण्याची वेळ आली तर विखे सहमती एक्सप्रेसमध्येही फूट पाडू शकतात, असे सांगितले जाते. त्यामुळेच आता आधी बँकेच्या यंदाच्या ऐतिहासिक निकालावर विखे पिता-पुत्र काय भाष्य करतात व नंतर बँकेच्या सत्ताकारणात काय भूमिका वठवतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post