जिल्हा बँक निवडणूक : 'बिनविरोध'मुळे नाराजी? चार जागांचे मतदान व निकाल उत्सुकतेचे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागांपैकी तब्बल १७ जागा बिनविरोध झाल्याने व नेतेमंडळींनी आपसात तडजोडी करीत आपल्या वा समर्थकांच्या जागा बिनविरोध काढून घेण्यात धन्यता मानल्याने मतदार मात्र नाराज झाले आहेत. दरम्यान, चार जागांसाठी शनिवारी (२० फेब्रुवारी) जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यानंतर रविवारी (२१ फेब्रुवारी) मतमोजणी होणार आहे. या चार जागांच्या निकालाकडे जिल्ह्याचे व बँकेच्या राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.


जिल्हा सहकारी बँकेच्या सभासद असलेल्या संस्थांच्या एका प्रतिनिधीला बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. १३६९ विविध कार्यकारी सेवा संस्था, शेतीपूरक ८१३ संस्था, बिगर शेती १३१६ संस्था व व्यक्तिगत ६० असे एकूण ३ हजार ५७७ प्रतिनिधी मतदार यंदाच्या निवडणुकीत होते. बँकेची निवडणूक मागील एक वर्षापासून चर्चेत होती व करोनामुळे ती वर्षभर पुढे ढकलली गेली असल्याने स्वतःच्या नावाचा प्रतिनिधी मतदार ठराव करून घेण्यासाठी अनेक सव्यापसव्य काहींना करावे लागले आहे. नेत्याचे आदेश असले तरी संचालक मंडळ सदस्यांची मनधरणी करीत स्वतःच्या नावाने मतदान अधिकार ठराव करून घेण्यात अनेकांची सर्व प्रकारची शक्ती लागली होती. अशा स्थितीत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी आपल्या एका मताला किंमत येईल, नेत्याकडून काही राजकीय पुनर्वसनाचे शब्द मिळतील वा अन्य काही राजकीय लाभ पदरात पडेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण नेते मंडळींनी या मतदान प्रतिनिधींना हिंग लावून विचारले नाही व परस्पर प्रतिस्पर्धी वा बड्या राजकीय नेत्यांचा आधार घेत एकमेकांच्या सहमतीने १७ जागा बिनविरोध करून घेतल्या. त्यामुळे अनेक मतदान प्रतिनिधी नाराज झाले आहेत. पण त्यांच्यादृष्टीने आता हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार झाला आहे. उघडपणे यावर कोणीही काहीही बोलू शकत नाहीत. पण आपसातील चर्चेत नाराजी व्यक्त होतेच.

त्या जागांची उत्सुकता
नगर तालुका, कर्जत तालुका व पारनेर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था अशा तीन मतदार संघांसह बिगर शेती संस्था मतदार संघ अशा चार जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था गटात १०९ मतदार असून, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व सत्यभामाबाई बेरड यांच्यात लढत होत आहे. कर्जत विविध कार्यकारी संस्था मतदार संघात अवघे ७४ मतदार असून, तेथे अंबादास पिसाळ व मीनाक्षी साळुंके यांच्यात लढत होत आहे. तर पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था गटात १०५ मतदार असून, येथे माजी संचालक उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात लढत होत आहे. तसेच बिगरशेती संस्था मतदारदार संघात १३१६ मतदार असून, येथे माजी संचालक दत्ता पानसरे व प्रशांत गायकवाड यांच्यात लढत होत आहे. या जागांपैकी कर्डिले, साळुंके, शेळके व गायकवाड यांनी पॅनेल करून कप-बशी हे समान निवडणूक चिन्ह घेतले आहे तर त्या प्रतिस्पर्ध्यांपैकी पिसाळ, भोसले व पानसरे यांनी विमान व बेरड यांनी छत्री चिन्ह घेतले आहे. चारही मतदार संघ मिळून एकूण मतदार १६०४ असून, ते मतदानातून काय किमया करतात, हे रविवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

विखेंची भूमिका महत्त्वाची
बँकेच्या बिनविरोध झालेल्या १७ जागांपैकी राहात्याची अवघी एक जागा विखे गटाची मानली जाते. बाकी १६ जागांपैकी बहुतांश जागा महाविकास आघाडी तसेच भाजपमधील सहमतीच्या मानल्या जातात. या पार्श्वभूमीवर आता राहिलेल्या चार जागांच्या होत असलेल्या निवडणुकीत विखेंची भूमिका महत्त्वाची मानले जाते. या जागांपैकी पारनेरला त्यांनी भोसलेंना तर बिगरशेतीमध्ये त्यांना पानसरेंना ताकद दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दोन जागांचे निकाल काय लागतात तसेच नगर तालुका व कर्जत मतदार संघाबाबत विखेंची भूमिका काय असेल, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post