जिल्हा सहकारी बँक : कौन बनेगा चेअरमन?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता थांबल्यानंतर व निकाल स्पष्ट झाल्यावर बँकेचा नवा अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या ८-१० दिवसातच बँकेच्या पदाधिकारी निवडीची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच या पदांवरील दावेदारी सुरू झाली आहे.

बँकेचे विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर हे सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत होते. पण अखेरच्या टप्प्यात त्यांचे नेते मधुकरराव पिचड भाजपमध्ये गेल्याने तेही भाजपचे अध्यक्ष मानले गेले. पण यंदाच्या निवडणुकीत गायकरांनी पिचडांना जवळपास सोडचिठ्ठी देत मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सहमती एक्सप्रेसमध्ये सहभाग घेऊन आपली जागा बिनविरोध करवून घेतली व आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांनाच पुन्हा यंदाही चेअरमनाची संधी मिळेल काय, याची उत्सुकता आहे.

बँकेच्या नव्या संचालक मंडळाच्या २१ सदस्यांपैकी सर्वाधिक ८ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. राहुरीचे अरुण तनपुरे, शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप, कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्यासह आशा तापकीर, उदय शेळके, प्रशांत गायकवाड व अमित भांगरे यांचा त्यात समावेश आहे. या खालोखाल भाजपचे ७ जण असून, त्यात सीताराम गायकर, अमोल राळेभात, विवेक कोल्हे, आ. मोनिका राजळे, अण्णासाहेब म्हस्के, शिवाजीराव कर्डिले व अंबादास पिसाळ असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसचे चारजण असून, त्यात माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपत सांगळे व अनुराधा नागवडे यांचा समावेश आहे. शिवसेनेचे एकमेव संचालक मंत्री शंकरराव गडाख आहेत. तर श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे नेमके कोणत्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, हे गुलदस्त्यात असल्यासारखे आहे. त्यामुळे या २१ संचालकांपैकी कोणाच्या गळ्यात चेअरमनपदाची माळ पडते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

काँग्रेसच्या गोटातून संगमनेरचे माधवराव कानवडे तर राष्ट्रवादीच्या गोटातून माजी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप ही नावे सध्या चर्चेत आहेत.

कर्डिलेंवर बरेचकाही अवलंबून
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे पॅनेल करायचे घाटत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून मंत्री थोरातांच्या सहमतीच्या राजकारणाला साथ देणारे राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मात्र सहमतीच्या राजकारणात बिनविरोध होता आले नाही. नेवाशाच्या गडाख गटाने व राहुरीच्या तनपुरे गटाने त्यात खोडता घातल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर आता कर्डिलेंनी बँकेत आक्रमक भूमिका घेण्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या दूध संघांना वाजवीपेक्षा जास्त अर्थसाह्य जिल्हा बँकेने केल्याचे त्यांचे म्हणणे असून, लवकरच प्रत्यक्ष आकडेवारीसह स्पष्ट म्हणणे व भूमिका ते जाहीर करणार आहेत. त्यामुळे कर्डिले आता जिल्हा बँकेच्या राजकारणात बहुतांश प्रस्थापितांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे ठाकण्याच्या पवित्र्यात आहेत. मात्र, त्यांची ही भूमिका जर दिग्गजांच्या भावी राजकारणाला छेद देणारी व अडचणीची ठरण्याची शक्यता असली तर सहमतीच्या राजकारणात कर्डिलेंना गप्प करण्यासाठी त्यांच्याच गळ्यात चेअरमनपदाची माळ पडण्याचीही शक्यता आहे. अर्थात, कर्डिले जिल्ह्यातील दिग्गज राजकारण्यांविरोधात कितपत कठोर भूमिका घेतात, यावर पुढच्या सत्ता समीकरणात त्यांच्या भूमिकेवर बरेचकाही अवलंबून असणार आहे व येत्या काही दिवसातच त्याचे स्पष्टीकरणही होण्याची शक्यता आहे.

दहा नवे चेहरे आले
जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये दहा नवे चेहरे आले आहेत. अमोल राळेभात, विवेक कोल्हे, माधवराव कानवडे, राहुल जगताप, आ. आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अमित भांगरे, गणपत सांगळे, अनुराधा नागवडे व आशा तापकीर या दहा नव्या संचालकांना ११ जुन्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या कारभाराचे धडे गिरवता येणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळात शंकरराव गडाख हे एकमेव मंत्री आहेत तर आशुतोष काळे व मोनिका राजळे हे दोन उमेदवार विद्यमान आमदार तसेच शिवाजीराव कर्डिले, चंद्रशेखर घुले, अण्णासाहेब म्हस्के, राहुल जगताप व भानुदास मुरकुटे हे ५ माजी आमदार आहेत. २१ संचालकांपैकी तब्बल १३ जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहकारी साखर कारखानदारीशी संबंधित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या म्हणवल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेचा कारभार साखर कारखानदारांच्या हाती गेल्याचे म्हटले तर वावगे ठरणारे नाही. दरम्यान, आता दोन तज्ज्ञ संचालकपदांवर कोणाची वर्णी लागते, याचीही उत्सुकता आहे. यातील एक नाव माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे फिक्स असल्याचेही आतापासूनच सांगितले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोण तज्ज्ञ संचालक होतात, हे पाहणेही महत्त्वाचे असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post