दिवसा फोडली जाताहेत घरे.. चोरांचा शोध पोलिसांना लागेना


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवसा ढवळ्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे जिल्हाभरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या चोऱ्या-घरफोड्यांतून लाखोंचा ऐवज चोरीला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांसह एलसीबीलाही चोरटे सापडत नाहीत, असे चित्र दिसू लागले आहे. आधीच कोरोनामुळे रोजगार व नोकरी-उद्योगधंद्यावर परिणाम झाला असताना दुसरीकडे चोऱ्यांमुळे नागरिक मात्र हतबल झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्याही मोठ्या प्रमाणात चोऱ्या व घरफोड्या होऊ लागल्याने आणि या चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने ग्रामीण व शहरी भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागांतून लाखोंचा ऐवज चोरीला जात आहे. या चोरट्यांचा स्थानिक पोलिसांबरोबरच एलसीबीलाही सुगावा लागत नसल्याने चोरटे पोलिसांवर शिरजोर झाल्याचे दिसून येत आहे.

शहरी भागात दिवसाढवळ्या चोऱ्या व घरफोड्या हीतर नित्याचीच बाब झालेली आहे. कुलूप बंद असलेल्या घरांची कुलुपे तोडून लाखोंचा ऐवज लुटला जात आहे. विशेषतः अपार्टमेंटमधील घरे यात सर्वाधिक फोडली जात आहे. पण आता ग्रामीण भागातही दिवसाढवळ्या असे प्रकार वाढू लागले आहेत. सध्या ग्रामीण भागात सुगीचे दिवस असल्याने शेतातील कामे करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची घरे फोडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.22) तीन-चार ठिकाणी घरफोड्या होऊन लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून सातत्याने घडत आहेत. मात्र, या चोरट्यांचा संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिसांना तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेलाही अद्याप सुगावा लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांपेक्षा चोरटे अधिकच हुशार झालेत की काय, अशी शंका येऊ लागली आहे. 

दरम्यान, शेतीच्या कामासाठी घराला कुलूप लावून कुटुंबासह शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात घरफोडी करीत अज्ञात चोरट्याने सोमवारी (दि.22) सकाळी 11 ते 11.30 च्या दरम्यान सुमारे साडेतीन तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे घडली. याबाबत शेतकरी शिवाजी लांडगे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महिनाभरात दुसऱ्यांदा घरफोड्या
जामखेड तालुक्यातील मोहरी गावात महिनाभरात दुसऱ्यांदा दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. गावातील शेतकरी चंद्रभान वाघमोरे यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 56 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि.22) दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे अज्ञात चोरट्याने दिवसा-ढवळ्या घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 71 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी (दि.21) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत घडली. मिरजगावातील पुराणिक कॉलनी येथे राहणारे नारायण घोडके यांनी याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post